अकोला - डीएड, बीएडच्या सध्याच्या स्थितीबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन अाणि प्रशिक्षण परिषद यांचे संशोधन सुरू आहे. त्याचा घसरता आलेख सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम ‘डीटीएड' आता डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन नावाने ओळखला जाणार आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येणार असून, त्याचा आराखडादेखील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
आता ‘एनसीएफटीई-२००९' ‘एसीटीई रेग्युलेशन-२०१४'मधील मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डीएलईडी) पुनर्रचित केलेला आहे.
नवा आराखडा
नव्या आराखड्यानुसार प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देणे, विद्यार्थ्यांना २० आठवडे शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करणे, अशा काही मुद्द्यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना एटीकेटी असावी का, पदविका अभ्यासक्रमातही सेमी इंग्रजी सुरू करावे का, कार्यानुभव, कला, शारीरिक शिक्षण या विषयांची परीक्षा कॉलेज स्तरावर ठेवता ती परिषदेकडून घेण्यात यावी का, याबाबत परिषदेने अभिप्राय मागवले आहेत. परिषदेच्या www.mscert.org.in या वेबसाइटवर नवीन आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यावर अभिप्राय मागवण्यात येत आहेत.
विद्यार्थी झाले कमी
पूर्वी बीएड आणि डीएड म्हणजे हमखास नाेकरी असे होते. मात्र, डीएड महाविद्यालयांचे पीक आल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली. मॅनेजमेंट कोट्यातून काठावार पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू लागला. त्यानंतर शासनाने आणलेल्या टीईटीमधून अशा विद्यार्थ्यांची खरी पात्रता समोर आली. १० टक्केही निकाल या परीक्षेचा न लागल्यामुळे आता तर दोन वर्षांपासून पुन्हा या उभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता अभ्यासक्रमातच बदल करून तो स्पर्धात्मक ठेवण्याचा मंडळाचा विचार आहे. त्या दिशेने पावलेही उचलण्यात आली आहेत.