आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट अकादमीसाठी दर्शन नळकांडेची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दर्शन नळकांडे)
अकोला- येथील अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू तथा सध्या व्हीसीए क्रिकेट अकादमीत असलेला दर्शन नळकांडे याची धर्मशाला (हिमाचल प्रदेश) येथे १० जूनपासून सुरू होणाऱ्या १७ वर्षांखालील नॅशनल क्रिकेट अकादमी शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सदर शिबिरासाठी देशभरातून केवळ २५ खेळाडंूची निवड करण्यात आली आहे. दर्शन हा मध्यमगती गोलंदाजी, तर मधल्या फळीत फलंदाजी करत असून, व्हीसीए क्रिकेट अकादमी नागपूरला प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी त्याने १४ वर्षांखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदा १६ वर्षांखालील विदर्भ संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावत त्याने १९ वर्षांखालील संघातही स्थान मिळवले. बीसीसीआय अंतर्गत १६ वर्षांखालील स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शनामुळे १८ एप्रिलपासून दिल्ली येथे मध्य विभाग शिबिरासाठी निवड झाली. तेथेही त्याने चांगले प्रदर्शन केल्यामुळे २० मे ते जूनदरम्यान बेंगळुरूजवळील शिमगो येथे आंतरविभाग क्रिकेट स्पर्धेसाठी मध्य विभाग क्रिकेट संघात उपकर्णधार म्हणून निवड झाली होती.
शिमगो येथे दक्षिण विभागाविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याने आक्रमक गोलंदाजी करत दोन्ही डावांत मिळून गडी टिपले. मध्य विभागाला विजय मिळवून दिला. त्यामुळे त्याची शिबिरासाठी निवड झाली. दर्शनची एनसीएमध्ये झालेली निवड ही अकोला क्रिकेट क्लबसाठी मोठी उपलब्धी असून, जिल्ह्यातील युवा क्रिकेट खेळाडंूसाठी प्रेरणादायी असल्याचे मत अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा व्हीसीएचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी व्यक्त केले. दर्शनच्या निवडीबद्दल त्याचे क्लबचे अध्यक्ष नानुभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, कैलास शहा, दिलीप खत्री, सदस्य अॅड. मुन्ना खान, विवेक बिजवे, जावेदअली, परिमल कांबळे, रवी ठाकूर, सुमेद डोंगरे, पवन हलवणे, देवकुमार मुधोळकर, एस. टी. देशपांडे आदींनी अभिनंदन केले आहे.
क्रिकेटचा आलेख उंचावता
अकोला क्रिकेट क्लबची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत असून, विदर्भाच्या १४, १६ १७ वर्षांआतील संघात अकोल्याच्या अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. तसेच अनेक चांगल्या ठिकाणी त्यांची निवड झाली आहे. एवढेच काय, तर कर्णधारपदही भूषवले आहे. अकोल्याच्या क्रिकेटपटू रवी ठाकूरनेही अनेक नामांकित स्पर्धांमधून चांगली कामगिरी बजावत अकोल्याचा गौरव वाढवला आहे.
नुकत्याच झालेल्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात १०० वर मुलांनी सहभाग नोंदवला असून, मुलींच्या प्रशिक्षणालाही सुरुवात करण्यात आली आहे. दर्शन नळकांडे याने यंदा १६ वर्षांखालील विदर्भ संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावत त्याने १९ वर्षांखालील संघातही स्थान मिळवले. त्यामुळे १८ एप्रिलपासून दिल्ली येथे मध्य विभाग शिबिरासाठी निवड झाली हाेती. त्याच्या निवडीबद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.