आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरड्यापेक्षा निदान ओला दुष्काळ बरा, नागरिक मोठय़ा शहरांमध्ये करताहेत स्थलांतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दोन महिन्यांनी लांबलेला पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पावसाने मध्येच मारलेली दडी, यामुळे बळीराजा चिंतातुर झाला असून, कोरड्या दुष्काळाच्या गर्तेत तो सापडला आहे. खरिपाचा हंगाम डामडोल असतानाच असाच पाऊस राहिला, तर रब्बी हंगामही धोक्यात येणार असल्याने त्याच्यासमोर मोठे संकट निर्माण होणार आहे. अशातच पशुधनाच्या चार्‍यापाण्याचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने, कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ बरा, अशा भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.
पश्चिम विदर्भामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे या जिल्हय़ामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उशिरा का होईना, जिल्हय़ामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र, त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे त्याच्या आशेवर विरजण पडले. उशिरा पेरण्या झाल्यामुळे हमी पिकाचा पेरा आणि उडीद, मूग या नगदी पिकांचा पेरा कमी झाला असून, यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. या पिकांनाही पुरेशा पाऊस नसल्यामुळे गावातील नागरिकांच्या रोजगारावर परिणाम होऊन, अनेक शेतमजूर मोठय़ा शहरांकडे कामधंद्यासाठी स्थलांतर करताहेत. तसेच पाण्याच्या साठय़ातही वाढ न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
का नको कोरडा दुष्काळ : कोरड्या दुष्काळाला काहीच पर्याय नाही. पिण्याच्या पाण्यापासून तर सर्वच गोष्टींवर कोरड्या दुष्काळाचा मोठा परिणाम होतो. यामध्ये जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, शेतकर्‍यांच्या दूधदुभत्या जोडधंद्याला त्याची झळ बसते. जिल्हय़ातील 80 टक्के शेती ही कोरडवाहू असल्यामुळे या उत्पन्नावरच शेतकर्‍यांचे कुटुंब आहे. नदी-नाल्यांना पूर नसल्यामुळे भूजल पातळीत घट होत असून, पावसाळा असतानाही विहिरींनी आता तळ गाठला असेल, तर बागायती शेती कशी येईल, असा प्रश्न निर्माण होतो.
ओल्या दुष्काळाला आहेत पर्याय : ओला दुष्काळ हा आपत्तीजनक असतो, त्यातही मोठी झळ बसतेच. मात्र, या दुष्काळाला पर्याय असतो, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ओला दुष्काळ झाला, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न उरत नाही. खरिपाचा हंगाम जरी हातातून जात असला, तरी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा राहत असल्यामुळे रब्बीची पिके घेता येतात. त्यामध्ये काही प्रमाणात नुकसान भरून निघण्याची शक्यता असते. नदीनाल्यांद्वारे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन बागायती शेतीवर शेतकर्‍यांची मदार राहते. त्यामुळे कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ पुरला, असे म्हटल्या जाते.
रब्बीला होतो फायदा
जादा पाऊस झाला, तर या पावसाचा फायदा रब्बी पिकांना निश्चित होतो. मात्र, कोरड्या दुष्काळाला काहीच पर्याय राहत नाही. ’’ रवी पाटील, प्रगतिशील शेतकरी.
सप्टेंबरच्या पावसावर रब्बी अवलंबून
पावसाचा मोठा खंड पडला आहे. पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर खरिपाच्या पिकांना फटका बसू शकतो. सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला, तरच रब्बीची पिके येतात. कारण सप्टेंबर महिन्याच्या पावसावरच रब्बीची पिके अवलंबून असतात. ’’ प्रमोद लहाळे, जिल्हा कृषी अधीक्षक, अकोला.
यंदा केवळ 47.98 मिमी पाऊस
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 मिमीने पाऊस कमी पडला होता. गतवर्षी 1 जून ते 14 ऑगस्टपर्यंत 69.99 मिमी पाऊस जिल्हय़ात पडला होता. मात्र, यंदा एकूण सरासरी 47.98 मिमी पाऊस झाला आहे.