आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानाचा ‘मेसेज’ खात्यात ठणठणाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक सिलिंडरधारक ग्राहकाला आधार कार्ड क्रमांक सिलिंडर जोडणीसोबत लिंक करणे बंधनकारक केले होते. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंत एक लाख चार हजार ग्राहकांनी त्यांचे गॅस कनेक्शन लिंकअप केल्याची माहिती पुरवठा विभागातून प्राप्त झाली आहे. गॅस सिलिंडरच्या अनुदानाचा केवळ मेसेज येतो, पण खात्यात पैसे जमा होत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे.

जिल्ह्यात गॅस सिलिंडरचे दोन लाख 43 हजार ग्राहक असून, यापैकी केवळ पन्नास टक्के म्हणजे केवळ एक लाख चार हजार ग्राहकांनी त्यांची जोडणी आधार कार्डमार्फत बँक खात्याशी लिंक केली आहे. केंद्र शासनाने गॅस सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम 1 मार्चपासून बँक खात्यात देणे बंद क रून ती सिलिंडर घेतानाच दिली जाईल, अशी घोषणा केल्याने सध्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

एकीकडे शासन गॅस कनेक्शन आधार कार्डसोबत बँक खात्याशी लिंकअप करण्याचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे ग्राहक संभ्रमात आहेत. गॅस सिलिंडर ग्राहकांना सबसिडी मिळणे ही फसवी योजना असून, केवळ कंपन्यांचा फायदा या योजनेतून होत असल्याचे दिसते.

इण्डेन, एच.पी. आणि भारत या तीन कंपन्यांमार्फत सद्य:स्थितीत गॅस सिलिंडरची विक्री होत आहे. गॅस सिलिंडरसाठी ग्राहकाला 1210 रुपये मोजावे लागत आहेत. यापैकी अनुदानाचे 722 रुपये बँक खात्यात जमा होत आहे. गॅस सिलिंडर बँक खात्याशी लिंकअप केलेल्या अनेक ग्राहकांना मोबाइलवर मेसेज तर येतो, पण बँक खात्यात पैसे जमा होत नाही, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत.

‘मेसेज’सोबत अनुदानही द्या
गाजावाजा करत अनुदानाचे गॅस सिलिंडर देण्यात येत आहे.मात्र, अनुदान बँक खात्यात जमा न होता केवळ मोबाईलवर मेसेज येत आहे. नुसता मेसेज न पाठवता अनुदान द्या, अशी मागणी होत आहे.

सिलिंडरचे दर 459.50 रुपये
गॅस सिलिंडर घेताना ग्राहकांना 1210 रुपये जमा करावे लागतात. अनुदानाचे 750 रुपये खात्यात जमा व्हायला हवे, पण प्रत्यक्षात 722 रुपये जमा होतात. यापैकी 28 रुपये कुठे जातात, हा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे.

18 दिवसांनंतरही रक्कम खात्यात जमा नाही
खडकी बु. भागातील रहिवासी रमेश जयराम ढेकळे यांनी 1 फेब्रुवारीला घेतलेल्या सिलिंडरच्या अनुदानाची रक्कम अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे केली आहे. त्यांनी मोहिनी इण्डेन, म्हाडा कॉलनी खडकी बु. अकोला येथून सिलिंडर घेतले होते. त्यांचे खाते महाराष्ट्र बँकेत आहे. रमेश ढेकळे हे सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांनी मोहिनी इण्डेन एजन्सीकडे संपर्क केला असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाठपुरावा सुरू
आधार कार्ड लिंक केल्यानंतरही बँक खात्यात गॅस सिलिंडरसाठी अनुदान जमा होत नसल्याच्या तक्रारी काही ग्राहकांकडून प्राप्त झाल्या आहेत. याच्याशी एजन्सीचा कुठलाही संबध नाही. तरीदेखील या समस्येबाबत ग्राहकांच्या हितासाठी पाठपुरावा सुरू आहे. ’’ मोहिनी चौधरी, व्यवस्थापक, मोहिनी इंडेन गॅस एजन्सी, खडकी बु. अकोला.

अनुदान कपात करून द्यावे
गॅस सिलिंडरसाठी शासनाकडून अनुदान जमा होत नसेल तर ग्राहकांना अनुदान कपात करूनच पूर्वीप्रमाणे मूळ किमतीत गॅस सिलिंडर मिळावे. त्यामुळे ते ग्राहकांना अधिक सोयीचे ठरेल.’’ शेषराव पाटील, ग्राहक, मलकापूर.

सबसिडी जमा होत आहे
गॅस सिलिंडरसाठी अनुदान जमा होणे सुरू आहे. सिलिंडरधारक ग्राहकांनी त्यांच्या जोडणीसोबत आधार कार्ड बँकेच्या अकाउंटसोबत लिंक करून घेणे गरजेचे आहे. ’’ प्रीती मिर्शीकोटकर, व्यवस्थापक, भारत गॅस कंपनी.