आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Department Of Public Works, Latest Ws N Divya Marathi

‘सार्वजनिक बांधकाम’ने थकवले रेल्वेचे दीड कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे लेव्हल क्रॉसिंग रस्त्याच्या वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे तब्बल दीड कोटी रुपये शुल्क थकवल्याने 1 एप्रिलपासून डाबकी, पारससह अन्य एक गेट बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील आर्थिक व्यवहाराचा फटका मात्र नागरिकांनाच बसणार आहे.
रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवरील रस्त्याची दुरुस्ती रेल्वेकडूनच केली जाते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे वार्षिक शुल्क रेल्वे प्रशासनास द्यावे लागते. रेल्वेगेटवरील गेटमन आणि इतर खर्चही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पैशातून व्हावा, असा रेल्वेचा नियम आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोला विभागाने रेल्वेचे रेल्वेगेट क्रॉसिंग नंबर 44 म्हणजे (डाबकी), गेट नंबर 32 बी (पारस), आणि पारस जवळील गेट क्रमांक 36 (ए) चे वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे एक कोटी 50 लाख 90 हजार 148 रुपये रक्कम थकवले आहेत. याबाबत भुसावळच्या मध्य रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून ही थकबाकी अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने रेल्वे विभागाने सदर रेल्वेगेट 1 एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आशयाची सूचना देणारे फलकही या लेव्हल क्रॉसिंग गेटवर लावण्यात आले आहे. अकोला रेल्वे कार्यालयाशी संपर्क केला असता, सर्व आदेश भुसावळहून आल्याची माहिती देण्यात आली.