आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deputy Commissioner Madhuri Madavi Transfer Issue Akola

उपायुक्त माधुरी मडावी यांच्या बदलीची चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नव्याने कर आकारणीची धडक मोहीम राबवून महापालिकेस कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या उपायुक्त माधुरी मडावी यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. अमरावती महापालिकेत त्यांची बदली होईल, असे बोलले जाते.

मनपात उपायुक्त, सहायक आयुक्तांसह विविध महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामुळे महापालिकेच्या विविध विभागाच्या कामाचा बोजा एकाच अधिकार्‍यांवर येऊन पडला आहे. तर काही अधिकारी असूनही काहीही कामाचे नसल्याने महापालिकेला केवळ त्यांच्या वेतनावरच खर्च करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत उपायुक्तांचे एक पद रिक्त होते. आता दोन पदे रिक्त झाली आहेत, तर सहायक आयुक्तांची दोन पदे रिक्त आहेत. जानेवारी महिन्यात सहायक आयुक्त माधुरी मडावी यांची अकोला येथे बदली झाली. त्यांनी रुजू झाल्यापासून नव्याने कर निर्धारणाचे काम हाती घेतले.

आतापर्यंत सिंधी कॅम्प परिसरात नव्याने कर आकारणी करण्याची मोहीम राबवण्याचे आश्वासन अनेक अधिकार्‍यांनी दिले. परंतु, माधुरी मडावी यांनी थेट मोहिमेला प्रारंभ केला. सिंधी कॅम्पमधील १५०० मालमत्तांवर नव्याने कर आकारणी केल्यानंतर आता ७१ टीम त्यांनी तयार करून शहरातील संपूर्ण मालमत्तेवर नव्याने कर आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चार महिन्यात नव्याने कर आकारणी करण्याची मोहीम पूर्ण करण्याचे टार्गेट त्यांनी निश्चित केले आहे. त्यानंतर नागरिकांना डिमांड नोटीस दिल्या जातील, जेणेकरून आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यापूर्वी मालमत्ता कराची वसुली करता येईल. मडावी यांची अमरावती येथे बदली होत असल्याची चर्चा ३० एप्रिलला रात्री शहरात पसरली. त्यांच्या कामाची दखल घेऊनच ही बदली केली जात असल्याचे बोलले जाते.

केवळ अफवा
मनपात अधिकार्‍यांची संख्या कमी आहे. लवकरच रिक्त पदे भरली जातील. उपायुक्त माधुरी मडावी चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य बजावत आहेत. कुणीतरी त्यांच्या बदलीची जाणुन बुजुन चर्चा सुरु केली आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा ही केवळ अफवा असून त्यांची बदली होऊ देणार नाही.'' डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री

रोखण्याचा प्रयत्न करू
रिक्तपदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तूर्तास महापालिकेत अनेक पदे रिक्त आहेत, तसेच माधुरी मडावी या कोणाचेही मन दुखवता आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी महसूल वाढीसाठी मोहीम सुरू केली आहे.त्यांची बदली होत असेल तर ती बदली रोखण्यासाठी प्रयत्न करू.'' आमदार गोवर्धन शर्मा