आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Detonator Found In Shivani Airport News In Marathi

शरद पवार, नरेंद्र मोदींच्या आगमनापूर्वी विमानतळावर स्फोटके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी येथील शिवणी विमानतळ परिसरात डिटोनेटर्स आढळले. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. शुक्रवारी 28 मार्च रोजी रात्रभर पोलिसांनी शिवणी विमानतळ परिसरात ‘सर्च’मोहीम राबवली आहे.

शरद पवार यांचा शनिवारी अकोलामार्गे अमरावतीसाठी नियोजित दौरा होता. शिवणी विमानतळावर त्यांचे आगमन होणार होते. मात्र, त्यांच्या दौर्‍यात अचानक बदल झाल्याने त्यांचा दौरा रद्द झाला, तर रविवारी 30 मार्च रोजी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा अकोला येथे असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. मोदींच्या सुरक्षेसाठी गुजरातचे पोलिससुद्धा अकोल्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, शिवणी विमानतळावर डिटोनेटर्स असल्याची माहिती शुक्रवारी रात्री सिव्हिल लाइन पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांची तारांबळ उडाली.

जिल्हा पोलिस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची शुक्रवारी रात्री शोधमोहीम सुरू झाली ती शनिवारी सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होती. यादरम्यान, शिवरच्या दिशेला विमानतळाच्या भिंतीला असलेल्या एका छिद्रामध्ये डिटोनेटर्स आणि त्याला एक वायर असल्याचे आढळून आले. हे डिटोनेटर्स 20 वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा पोलिसांनी केला. 100 पोलिसांच्या ताफ्याने रात्री संपूर्ण विमानतळ परिसर पिंजून काढला.

एटीएसने केली पाहणी
एटीएसने रात्री शिवणी विमानतळाची तपासणी केली. डिटोनेटर्स आढळल्यामुळे दहशतवादी शक्ती या कृत्यामागे आहेत काय, या दिशेने एटीएसने तपास केला आहे. डिटोनेटर्स आढळून आले असले, तरी ते 20 वर्षांपूर्वीचे आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. तसेच एटीएसचे जवान मोदींच्या सभेसाठी तैनात असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

ठाणेदारांनी राबवली शोधमोहीम
विमानतळावर डिटोनेटर्सची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहरातील सर्व ठाण्यांचे ठाणेदार आणि त्यांचा ताफा शोधमोहिमेत सहभागी झाला होता. रात्रभर शोधमोहीम राबवली असतानाही पोलिसांनी मात्र अधिक माहिती देण्यास नकार दिला.

डिटोनेटर्स 20 वर्षांपूर्वीचे कसे
ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची अकोल्यात सभा झाली होती, तेव्हा ते विमानानेच अकोला येथे आले होते. त्यावेळेस विमानतळावर डिटोनेटर्स शोधपथकाला आढळले नाही. पोलिसांच्या दाव्यानुसार 20 वर्षांपूर्वीचे जुने स्फोटक कसे असू शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.