आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मशाळेलाच हवा आधार; कान्हेरी येथील धर्मशाळेची दुरवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एकेकाळी वाटसरू तसेच प्रवाशांना आश्रय देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कान्हेरी (गवळी) येथील धर्मशाळेलाच आज आधाराची गरज आहे. गुरे-ढोरे या धर्मशाळेत मुक्काम ठोकत आहेत. जिल्हा परिषदेच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील एकमेव जिल्हा परिषदेच्या मालकीच्या धर्मशाळेची दुरवस्था झाली आहे.
५० ते ६० वर्षांपूर्वी प्रवासासाठी वाहने नव्हती. त्यामुळे बैलगाडी, घोडा या माध्यमातून अथवा पायी चालून प्रवास केला जात असे. यामुळे जुन्या काळात अनेक शहरांमध्ये दानशूर व्यक्तींनी धर्मशाळा बांधल्या. बाळापूर ते अकोला या २२ किलोमीटर अंतरात एकही धर्मशाळा नव्हती. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना मुक्काम करण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे प्रवाशांना रात्री-बेरात्री प्रवास करावा लागत असे. यादरम्यान, जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर कान्हेरी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेला सात एकर जागा दान दिली.
कान्हेरी येथील नि. सी. हाडोळे यांनी गावातील दानशूर जागोजी सोनाजी काळे यांना या जागेत धर्मशाळा बांधण्यासाठी देणगी देण्यास प्रवृत्त केले. जागोजी काळे यांनी दिलेल्या पाच हजार रुपयांच्या देणगीतून कान्हेरी फाट्यावर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष नि. श्री. सपकाळ यांनी धर्मशाळा बांधण्यास मंजुरी दिली. १९६५ ला या धर्मशाळेचे लोकार्पण करण्यात आले.
दोन प्रशस्त खोल्या, समोर दगडी बांधकाम केलेली वहिीर, बसायला ओटा, असे या धर्मशाळेचे स्वरूप होते. पायी अथवा बैलगाडीने प्रवास करणारे प्रवासी रात्र झाल्यास या धर्मशाळेत मुक्काम करत, तर दविसा धर्मशाळेत घटकाभर थांबून जेवण करत असत. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे १९८० पर्यंत या धर्मशाळेचा वापर सुरू होता.

परंतु, पुढे वाहनांची संख्या वाढल्यानंतर ही धर्मशाळा ओस पडू लागली. जिल्हा परिषदेनेही या धर्मशाळेकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या धर्मशाळेचा वापर कुट्टी ठेवणे, जनावरे बांधणे, आदींसाठी होऊ लागला. त्यामुळे एकेकाळी वाटसरूंना आश्रय देणार्‍या या धर्मशाळेलाच आज आधाराची गरज निर्माण झाली आहे. या धर्मशाळेची अाज झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलणे अावश्यक अाहे.
१९९२ ला झाले वनीकरण
जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष किसनराव गवळी यांच्या कार्यकाळात १९९२ साली वनीकरण करण्यात आले होते. परंतु, आज शेती केली जाते, तर ही जागा जिल्हा परिषदेला दान दिल्यानंतर जिल्हा परिषदेने ही जागा नावावर न केल्याने संबंधितांच्या वारसांनी ही जागा न्यायालयाच्या माध्यमातून परत मिळवली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
अधिकारी अनभिज्ञ
जिल्हा परिषदेच्या मालकीची धर्मशाळा आहे, याबाबत जिल्हा परिषदेतील अधिकारी अनभिज्ञ आहेत, तर जिल्हा परिषद सदस्य अथवा पदािधकाऱ्यांनीही या धर्मशाळेच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. नियोजनाच्या अभावामुळे या धर्मशाळेचा ग्रामस्थांनाही उपयोग होत नाही, तसेच जिल्हा परिषदेला महसूलही मिळत नसल्याची स्थिती अाहे.