आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हर बोला महादेव’च्या गजरात धारगड यात्रा सुरू; भाविकांची गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- नैसर्गिक सौंदर्य व धार्मिक स्थळाचा आकर्षणबिंदू म्हणजेच धारगड. शिवभक्तांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र धारगड यात्रेला दूरवरून शिवभक्त ‘हर हर बोला महादेव’चा गजर करत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत दरवर्षीप्रमाणे आज असलेल्या तिसर्‍या श्रावण सोमवारी हजारोंच्या संख्येने दाखल होत आहेत. निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्माचा सुरेख संगम असलेल्या या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

श्री क्षेत्र धारगड येथे शिवालय असून, हे सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचीवर हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या अतिशय प्राचीन अशा नरनाळा किल्ल्याच्या छातीशी आहे. येथे चार कोनी गुहा असून, या गुहेमध्ये दोन स्वयंभू शिवलिंग व नंदी आहे. महादेवाचे हे शिवलिंग केव्हा व कसे निर्माण झाले, याचा कुठलाही ठोस पुरावा इतिहासात आढळत नाही. याबाबत आख्यायिका मात्र ऐकावयास मिळतात.

नैसर्गिक जलाभिषेक
श्री क्षेत्र धारगड येथे असलेला निसर्गनिर्मित धबधबा भक्तावर जणू जलाभिषेक करतो. निसर्गाने केलेली भक्तांची पूजा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखीच असते. या यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतरच तिचा अविट गोडवा अनुभवास येतो. भक्तीचा हा महापूर सोमवारी पाहण्यासारखा असतो.

सोईस्कर मार्ग
धारगडला जाण्याकरिता सोयीचा व सोयीस्कर मार्ग हा अकोटवरूनच आहे. अकोटातील रस्ते रविवारीच भक्तांनी फुलून गेले आहेत. धारगड हे पूर्वी दुर्गम भागात होते. पण, आता बसेस सोबत खासगी वाहनेसुद्धा धारगडपर्यंत नेल्या जाऊ शकतात श्री क्षेत्र धारगड हे अकोटवरून पाऊल वाटेने 25 कि.मी. असून, वाहनाच्या रस्त्याने 35 ते 40 कि.मी. येते. अकोटपासून 25 कि.मी. वर पूर्णा नदीच्या जलाची भरलेली कावड खाद्यांवर घेऊन भक्तगण पोपटखेड मार्गाने जातात.

अकोटवरून 45 बसेस
धारगड येथे जाण्यासाठी 45 बसेस अकोट आगारातून सोडण्यात येत आहे. सोमवारी बस सुरू राहणार.