आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित पाणी करतेय आरोग्याची हानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - व्यवस्थापना अभावी खारपाणपट्ट्यातील पाणीप्रश्न गंभीर बनत चालला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, या भागातील समस्या सोडवण्यासाठी स्थायी योजना सुरू करण्याची गरज आहे.
तात्पुरती मलमपट्टी कामाची नाही हे या भागाची पाहणी केल्यावर दिसून येते. बोअर, विहिरीचे पाणी पिण्यास योग्य नाही, असा निर्वाळा तपासणी अहवाल येतो. त्यानंतर आरोग्य यंत्रणा, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी खडबडून जागे होतात. मात्र, त्यानंतर पुन्हा या भागातील लोकांना समस्येशी झुंजण्यास सोडून देण्यात येते.

खारपाणपट्ट्यातील बारुला भागात पाण्याची समस्या आहे सोबतच सांगळूद ते कौलखेड जहागीरपर्यंतची खारपाणपट्ट्यातील जी गावे आहेत त्या गावांनाही दूषित पाण्याचा फटका बसत आहे. या भागाला खांबोरा योजनेतून पाणीपुरवठा होतो. परंतु, जलवाहिन्या फुटल्या असल्याने गावातील टाकीपर्यंत पाणी पोहोचत नाही. बऱ्याचदा मातीमिश्रित पाणी गावकऱ्यांना मिळते. ते वापरण्यासही उपयुक्त नसते.
पावसाळ्याच्या दिवसात तर दूषित पाण्यामुळे डायरियाच्या रुग्णांची संख्या वाढलेली असते. गोडे पाणीच मिळत नसल्याने समस्या उग्र रूप धारण करत आहेत.

१९९५ मध्ये युतीचे शासन असताना ६४ खेडी पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली. टाक्या उभ्या झाल्या. लाखो रुपये खर्च झाले, परंतु पाणी समस्या सुटण्यासाठी काहीएक उपयोग झाला नाही, असा आरोप या भागातील रहिवासी करतात. चुकीचे व्यवस्थापन त्यास कारणीभूत आहे. पळसो बढे गावातही पाण्याची समस्या आहेच. तेथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. वाहनांवर पाण्याचे पिंप घेऊन दोन-तीन कि. मी. वरून पाणी आणावे लागते.
हे गाव खासदार, आमदार, जि.प. अध्यक्षांचे आहे. दहीगाव गावंडे हे गावही माजी आमदारांचे आहे, परंतु तेथील लोकांना विचाराल तर पंधरा-वीस दिवसातून एकदा पाणी मिळते. बोअर, विहिरीचे पाणी पिण्यास योग्य नाही. त्यामुळे आहे त्या पाण्यात भागवावे लागते.

पळसोला लागून शहापूर, कासमपूर, पळसो बु., पळसो खु., गोंडापूर ही गावे आहेत. या गावांची लोकसंख्या १८ ते २० हजार आहे. कासमपूरला पाण्याची टाकी देण्यात आली आहे. ५० हजार लीटर पाणी क्षमतेच्या टाकीतून योग्य पाणीपुरवठा होत नाही. योजना चुकीच्या पद्धतीने राबवल्या जातात आणि गावे मात्र तहानलेली राहतात.

कौलखेड जहागीरला ११ बोअर घेण्यात आले. पण, बोअर घेताना कुठलेही पथ्य पाळण्यात आले नाही. बोअर करण्यावर झालेला खर्च वाया जातो. सध्या गावात दोन बोअर सुरू आहेत. हापशांपैकी बंद आहेत. भूगर्भतज्ज्ञांचा अहवाल घेऊन पाण्याचे स्रोत पाहून बाेअर केल्यास त्याचा फायदा होईल अन्यथा खर्च व्यर्थ जातो. ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडवण्याबाबत प्रशासन गंभीर नाही, असा आरोपही ग्रामीण भागातील नागरिक करतात. येथे एकराचा जुना तलाव आहे. तलावातील पाणी लोक वापरतात. गुरेही येथील पाणी पितात. पूर्वी तर गावातील लोक पाणी पित होते. आता अन्य स्रोतांचे दूषित पाणी नाइलाजाने त्यांना प्यावे लागत आहे. सध्या तलावात पाणी आहे, परंतु पुढे समस्या उग्र होणार आहे. गावकऱ्यांनी लोकसहभागातून तलावाचे खोलीकरण केले.

प्रस्ताव आल्यास योजनेचा विचार करू
^कौलखेडजहागीर येथील सरपंचाकडून प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पेयजल योजनेचा विचार करता येईल. त्या भागाला सध्या खांबोरा योजनेतून पाणी पुरवले जात आहे. आठ दिवसाआड पाणी देत आहोत. भविष्यात टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवले जाऊ शकते.'' सुनीलचव्हाण, उपविभागीयअभियंता.

राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करावी
^कौलखेडजहागीरला लागून असलेल्या खडका येथे गोड्या पाण्याचा डोह आहे. या डोहाचे पाणी कौलखेडला मिळाले तर प्रश्न सुटू शकतो. राष्ट्रीय पेयजल योजनेतून त्यास मंजुरी द्यावी. त्यामुळे गावातील बरेच प्रश्न सुटू शकतील. विशेष म्हणजे लोकांचे आरोग्य चांगले राहील.'' अनिलतायडे, सरपंच,कौलखेड जहागीर

व्यवस्थापनाचा अभाव हेच प्रमुख कारण
^पाणीप्रश्नसुटू शकतो, परंतु प्रशासनातील व्यवस्थापनाचा अभाव असल्याने समस्या नासूर होते परंतु ती सुटत नाही. कोट्यवधींचा खर्च होतात. मात्र, निष्पन्न काहीच नाही. जाहिरातींवर जेवढा खर्च केला जातो त्यातील अर्धा पैसा जरी योजनांच्या पूर्ततेसाठी खर्च केला तर गावांतील पाणी समस्या सुटू शकते.'' मनोजतायडे, सामाजिककार्यकर्ते