आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disconnect The Power Supply To The City Towers Failure

शहरातील बत्ती गुल- टॉवरमध्ये बिघाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-पारसवरून अकोल्याला येणार्‍या विद्युत वाहिनीत गायगावजवळच्या मिल्ट्री स्कूलजवळील एका टॉवरमध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे शहरातील बत्ती गुल झाली असून, महावितरणने अनेक फीडर्सवर पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा केला आहे. एकूण 10 फीडर्सवरील वीजपुरवठा प्रभावित झाला. महापारेषण अधिकार्‍यांकडून दुरुस्तीचे कार्य युद्धपातळीवर होत असले, तरी यामुळे नागरिक त्रस्त झाले.
पारस औष्णिक विद्युत केंद्रातून महावितरणच्या शहरातील गोरक्षण, आपातापा येथील 132 के.व्ही.च्या उपकेंद्रात वीजपुरवठा येतो. त्यानंतर गोरक्षण उपकेंद्रातून शहरातील काही फीडर्सवर वीजपुरवठा होतो. पारसवरून गोरक्षण उपकेंद्रापर्यंत येणार्‍या विद्युत वाहिनीच्या एका टॉवरमध्ये गुरुवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे गोरक्षण उपकेंद्रावरील खदान, कौलखेड, अकोला टाउन, बिर्ला, उमरी, मोहता, गोरक्षण, चित्रा, इंडस्ट्रिज आदी फीडर्सवरील वीजपुरवठा दुपारपासून खंडित झाला.
महापारेषणच्या अधिकार्‍यांनी टॉवरवरील तांत्रिक बिघाडाचा शोध घेतला असून, त्याच्या दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी महावितरणने गोरक्षण उपकेंद्रावरील अकोला टाउन, बिर्ला, मोहता, गोरक्षण, चित्रा,इंडस्ट्रिज आदी फीडर्सवरील वीजपुरवठा विद्युत भवन, तुकाराम व जिल्हाधिकारी उपकेंद्रावरून जोडण्यात आला आहे. त्यामुळे या फीडर्सवर वीजपुरवठा सायंकाळच्या सुमारास सुरळीत झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र, उमरी, खदान आणि कौलखेड फीडर्सवरील वीजपुरवठा महापारेषणच्या टॉवरवरील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यावरच सुरळीत होणार असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
दुरुस्ती युद्धपातळीवर
विद्युत वाहिनीच्या एका टॉवरमधील तांत्रिक बिघाडाचा शोध घेतला आहे. दुरुस्तीकार्य दुपारपासून करण्यात येत आहे. दुरुस्ती होताच वीजपुरवठा सुरळीत होईल.’’ अंबादास जाधव, कार्यकारी अभियंता, महापारेषण
गायगावजवळील टॉवरवर बिघाड
आद्र्रतेमुळे दुरुस्तीचे कार्य प्रभावित : हवेतील आद्र्रतेमुळे टॉवरवरील दुरुस्तीचे कार्य प्रभावित झाले. ओलाव्यामुळे शॉक लागण्याची भीती असते. त्यामुळे दुरुस्तीचे कार्य अतिशय सावधतेने करावे लागते. जीव मुठीत घेऊन महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी दुरुस्तीचे कार्य करत होते.
अतिरिक्त ‘लोड’मुळे बिघाड : विद्युत वाहिनीच्या टॉवरमध्ये अतिरिक्त लोडमुळे बिघाड झाल्यामुळे शहरातील 10 फीडर्सवरील वीजपुरवठा खंडित झाला. जनरेटर लावून महापारेषणचे अधिकारी, कर्मचारी दुरुस्ती करत होते.
इतर उपकेंद्रांवरून घेणार बॅकअप
टॉवरमधील तांत्रिक बिघाडामुळे शहरातील 10 फीडर्सवरील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने इतर उपकेंद्रावरून बॅकअप घेतल्याने त्यापैकी 7 फीडर्सचा वीजपुरवठा सुरळीत झाला. उर्वरित वीजपुरवठाही सुरळीत होईल ’’ धर्मेश मानकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, अकोला