अकोला- 1995 साली तालुकास्थानी औद्योगिक वसाहतींना भूखंडांचे वितरण झाले. ग्रामीण भागात उद्योगांचे जाळे विणून त्या माध्यमातून रोजगार निर्माण व्हावा, हा उद्देश काहीअंशी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर एमआयडीसी सोडल्या तर अन्य ठिकाणची उद्योगांची स्थिती समाधानकारक नाही. जिल्ह्यात मोठा उद्योग नसल्याने पूरक उद्योग विकसित होत नाहीत, असे चित्र आहे.
अकोला औद्योगिक वसाहतीतील फेज क्रमांक १, २, सन १९६८ मध्ये कार्यरत झाले. यामध्ये ५६४ भूखंड आहेत. त्यातील ५६१ भूखंडांचे वितरण झाले. ४१७ उद्योग सुरू आहेत. अकोला ग्रोथ सेंटरचे काम १९९८ साली सुरू झाले. येथे ११३६ भूखंड असून, त्यापैकी ८१२ भूखंडांचे वितरण झाले. सद्य:स्थितीत २७३ उद्योग सुरू झालेले आहेत. एन ब्लॉकमध्ये नवीन ले-आऊट झालेले आहे. या िठकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अकोला आैद्योगिक वसाहतीला पाण्याची समस्या भेडसावत आहे. काटेपूर्णा धरणातून पाणी सोडले नाही तर एमआयडीसीला अडचण येते. दररोज १८०० क्युबिक पाण्याची गरज आहे. पाण्याची अडचण लक्षात घेऊन सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत उद्योगांना पाणी पुरवण्यात येत आहे. अकोल्यातील समस्या असल्या तरी त्या तातडीने मार्गी लावल्या जात आहेत.
तालुकास्थानावरील औद्योगिक वसाहतींचा विचार केला तर ठरावीक तालुक्यांमध्येच उद्योग चांगल्या रीतीने सुरू आहेत. अन्यत्र गोंधळाची स्थिती दिसून येते. अकोट येथे लघू औद्योगिक वसाहत आहे. येथे ६८ भूखंडांपैकी ५५ चे वितरण झाले. मात्र, सद्य:स्थितीत २० युनिटमध्येच उत्पादन सुरू आहे. सोयी-सुविधा, पाणीपुरवठा मुबलक आहे. मूर्तिजापूर औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र १८०.६० हेक्टर असून, १०१ भूखंडांपैकी ८५ भूखंड उद्योजकांना वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी २१ युनिटमध्येच उत्पादन सुरू आहे. काही स्थानांवर बांधकाम सुरू आहे तर अन्यत्र काहीही प्रगती नाही. तेल्हारा येथे ३१ भूखंडांपैकी २६ चे वितरण झालेले आहे, परंतु फक्त युनिटमध्ये उत्पादन होत आहे.
बाळापूरमध्ये 12 भूखंडांपैकी 11 चे वितरण उद्योजकांना करण्यात आले आहे. मात्र, केवळ एका िठकाणीच उत्पादन सुरू आहे, तर पातूर एमआयडीसीमध्ये २६ पैकी २६ भूखंडांचे वितरण उद्योजकांना करण्यात आले. त्यातील एका ठिकाणीच सध्या उत्पादन सुरू झालेले आहे. तालुकास्थानी उद्योगांबाबत अनास्थाच दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात मोठा उद्योग अद्याप आला नाही. जे काही उद्योग होते ते बंद झाले. त्यामुळे लहान उद्योगांना चालना मिळत नाही, असे बोलले जात आहे. आैद्योगिक वसाहतीचे वरिष्ठ अधिकारी उद्योगांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी तत्पर आहेत. १९९५ ते २०१४ अशी २० वर्ष होऊनही तालुकास्थानी उद्योगांची म्हणावी तशी वाढ झालेली नाही.