आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Council Standing Committee Meeting In Akola

जिल्‍हा परिषदेच्या स्थायी सभेत नियमबाह्य ‘बूट’ही नाकारले, बोगस ठेकेदाराला काम देण्यावरून गदारोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शिक्षण विभागातील अनागोंदी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत गाजली. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खरेदी करावयाचा बुटांचा कंत्राट यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या कंत्राटदाराला पुन्हा देण्यात येत असल्याची बाब स्थायी समिती सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी उपस्थित केली. सदस्यांना विचारात घेता ऐनवेळी आलेल्या विषयात त्याला स्थान देणे सर्वथा चुकीचे आहे. हा ठराव मंजूर झाल्यास त्याविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे दाद मागू, असा पवित्रा त्यांनी घेतला. पाच सदस्यांनी या विषयाला विरोध केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची बैठक बुधवारी दुपारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात झाली. उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, सभापती द्रौपदाबाई वाहोकार, गोदावरीताई जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार व्यासपीठावर होते. बाभुळगावच्या प्राथमिक शाळेतील खिचडी वाटपातील गैरप्रकाराबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कचवे परगावी गेलेले असल्याने उपशिक्षणाधिकारी प्रभाकर मेहरे यांनी विषय मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु सदस्यांचे समाधान झाले नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी चौकशी केली असता, ७९ टक्केच उपस्थिती आढळल्याचे दिसून आले. केंद्रप्रमुखाला कारणे दाखवा नोटीस द्या, अशी मागणी केल्यावर मेहरे म्हणाले, स्वाक्षरीनिशी कारवाईचे पत्र देतो. तेथील सहायक के. टी. चव्हाण यांना अन्यत्र पाठवा, अशी मागणी सभागृहाने केली. सहायक शिक्षकाकडे विस्तार अधिकारी म्हणून, तर गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार कृषी अधिकाऱ्यांकडे दिला जातो, हा गंभीर प्रकारही सभेत मांडला. सभेचे अध्यक्ष गवई यांनीही नाराजी व्यक्त केली. शिक्षण विभागात अशा प्रकारे काम होत असेल तर कसे चालायचे, असे सांगून पुढच्या बैठकीपूर्वी संबंधितांवर कारवाई निश्चित करा, असा आदेश दिला. अतिरिक्त शिक्षकांच्या तात्पुरत्या समायोजनाबद्दल प्रत्येक गटविकास अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले. पूर्णेचे दूषित पाणी लोकांच्या जीवनाशी निगडित बाब आहे, त्यामुळे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, तसेच फौजदारीचा इशारा त्यांना द्या, असे निर्देश अध्यक्षांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सोळंके यांना दिले. प्रदूषण विभागाचे अधिकारी सभेला अनुपस्थित असल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
मार्चपूर्वी पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लावा : मार्चपूर्वीनिधी खर्च होण्यासाठी काही विषय वेळेवर सभेत उपस्थित झाल्याचे उपाध्यक्ष, बांधकाम समिती सभापती गुलाम हुसेन गुलाम नबी यांनी सांगितले. विषयांची पूर्तता अधिकाऱ्यांनी केलीच पाहिजे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार म्हणाले. मार्चच्या बैठकीपूर्वी पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लागली पाहिजे, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले.
रुग्णालय दुरवस्थेवर चर्चा : चतारीयेथील पाणीपुरवठा विभागाच्या तक्रारीची माहिती द्या, अशी मागणी विजय लव्हाळे यांनी केली. तेल्हारा येथील रुग्णालयाची दुरवस्था याविषयी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंभारे यांना विचारणा झाली. गाडेगाव येथील ग्रामसेवकाची उद्धट वर्तणूक, पंजाबराव शिरसाट यांना दुकानापोटी परत करावयाचे रु. ३० हजारांची अनामत रक्कम या विषयांवर चर्चा झाली.
बोकडे यांची चौकशी अंतिम टप्प्यात : पंचायतविभागातील अधीक्षक बोकडे विभागातील महिला कर्मचाऱ्यांना त्रास देतात, अशी तक्रार आहे. हा मुद्दा शोभाताई मुळे यांनी उपस्थित केला. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार म्हणाले, बोकडे यांची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. एक आठवड्यात ती पूर्ण होईल. समिती सदस्य दामोदर जगताप, उंबरकर, लांडे हेही चर्चेत सहभागी झाले होते.