आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Guardian Minister Rajendra Darda Speaking In Akola

जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकोला-अकोट मार्गावरील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी शासनाने 17 कोटी 60 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास मंजुरी दिली आहे. या कामाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली.

भारतीय प्रजासत्ताक 64 वा वर्धापन दिन समारंभ 26 जानेवारीला लाल बहाद्दूर शास्त्री स्डेडियमवर उत्साहात झाला. पालकमंत्री दर्डा यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अरुण शिंदे, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श उपस्थित होते. यानंतर पालकमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झालेल्या पथकाची खुल्या जीपमधून पाहणी करून त्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली. त्यानंतर जिल्ह्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात 1 फेब्रवारीपासून अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात सावकारी अध्यादेश 2014 हा कायदा 16 जानेवारीपासून लागू झालेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची सावकाराकडून होणार्‍या आर्थिक पिळवणुकीस आळा बसेल. शेतकरी व शेतमजुरांचे सावकारी कर्जांच्या अवाजवी व्याजदरापासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

यासोबतच बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार 6 ते 14 वयोगटांतील बालकांना मोफत व सक्तीचे गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली असून, मुलींच्या शिक्षणातील गळती थांबवण्यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत लेक शिकवा अभियान 3 ते 26 जानेवारी या कालावधीत राज्यात राबवण्यात आले, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

या वेळी जनगणना 2011 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या उपजिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ, तहसीलदार समाधान सोंळके यांचा सत्कार करण्यात आला.

या समारंभास आमदार गोपिकिशन बाजोरिया, वसंतराव खोटरे, हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, अरुण उन्हाळे, अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले. कवायती सादरीकरणाचे संचलन राजकुमार तडस यांनी केले.

टूरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी निधी
जिल्ह्यात वनविभागार्फत अकोट तालुक्यातील शहानूर येथे युको टूरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रकल्प साकारण्यात येत आहे. याशिवाय वारी येथे विशेष सुविधा निर्माण करण्यासाठी 40 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

चार हजार 238 घरकुलांना मंजुरी
इंदिरा आवास योजनेंतर्गत चार हजार 238 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच रमाई घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण विभागासाठी नऊ हजार 790 लाभार्थ्यांना 70 कोटी 94 लक्ष, तर शहरी विभागात एक हजार 192 लाभार्थ्यांना 17 कोटी 19 लक्ष रुपये वितरित करण्यात आले आहेत.

विविध कामांसाठी 100 कोटींचा निधी
जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विकासकामांवर या वर्षी सर्वसाधारण योजनेत 100 कोटी, अनुसूचित जाती योजनेसाठी 46 कोटी व आदिवासी उपयोजनेत 17 कोटी 75 लाख रुपये निधी मंजूर झाला असून, जिल्ह्यातील अनेक विकासकामांवरील खर्च विविध यंत्रणेमार्फत 31 मार्च 2014 पर्यंत खर्च होईल, अशी ग्वाही या वेळी पालकमंत्र्यांनी दिली.