आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगव्या महाराष्ट्रासाठी कटिबद्ध व्हा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भगवा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठीचा यज्ञ शिवसेनेच्या ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ अभियानाद्वारे सुरू झालेला आहे. यामध्ये भगव्यावर विश्वास असणा-या प्रत्येकाने आहुती टाकावी. अभियानाचे महत्त्व केवळ सांगायचे नाही, तर ते प्रत्येक घरात मुरवायचे आहे, असे आवाहन शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख आमदार दिवाकर रावते यांनी केले.

आयएमए सभागृहात शनिवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात सदस्य नोंदणीचा शुभारंभ, शिवबंधन सोहळा झाला. केवळ धागाबंधन नाही, तर विचाराप्रति संकल्पबद्ध होण्याची प्रतिज्ञा आहे. त्यामुळे अभियानाचे महत्त्व ध्यानात घ्या, असेही रावते म्हणाले. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांचा गोंधळ झाला. विधानसभा निवडणुकीत तसे होऊ देऊ नका. कारण पक्ष मजबूत करण्याचे काम मतदार नोंदणीतून होत असते. आपण जिल्हानिहाय करीत असलेल्या मतदार नोंदणीचा आढावा मुंबईतील वॉररूममध्ये घेतला जाणार आहे, याची जाणीव ठेवा, याकडेही दिवाकर रावते यांनी लक्ष वेधले.

जुन्या लोकांना विश्वासात घेऊन अभियान राबवा, तसेच विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी तयारी करा, असे आवाहन माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी केले. ज्योत्स्ना चोरे यांनी मनोगत व्यक्त केले. खडसे यांनी शिवसेना गीत गायले. त्यांचा रावते यांच्या हस्ते 1100 रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी केले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर आ. संजय गावंडे, माजी आ. रामाभाऊ कराळे, युवा सेनेचे संग्राम गावंडे, अ‍ॅड. अनिल काळे, डॉ. विनीत हिंगणकर, सेवकराम ताथोड, बंडूभाऊ ढोरे, चंद्रशेखर पांडे, गजानन पावसाळे, दिलीप गावंडे, हरिभाऊ भालतिलक, बादलसिंग ठाकूर, मंजूषा शेळके होते. संचालन धनंजय गावंडे यांनी केले.
भारिप-बमसंचे तायडे शिवसेनेत
भारिप-बमसंचे जिल्हा संघटक गुड्डू तायडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. आ. रावते यांनी त्यांचे स्वागत केले. शिवसैनिकांना शिवबंधनातून भगव्याशी इमान राखण्याचे आवाहन करण्यात आले.