आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात खरेदीची दिवाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सोने - चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढत असले तरी धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफा बाजारपेठ गर्दीने ओसंडून गेल्याचे आज दिसून आले. सराफा बाजारपेठेतील विविध शोरूम सजल्याने बाजारपेठ झळाळून निघाली होती. नवीन डिझाइनसोबतच पारंपारिक आभूषणांनी दुकाने सजली होती. या ठिकाणी ग्राहकांनी खरेदीला मोठा प्रतिसाद दिला.

उत्सव आणि अलंकार खरेदीचे नाते तसे जुने आहे. त्यामुळे सण आणि मुहूर्ताच्या निमित्ताने आवर्जून खरेदी होते, त्यातही दिवाळी म्हणजे खरेदीची लयलूटच. धनत्रयोदशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे आज बाजारपेठेत उलाढाल झाली. सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घर खरेदीसाठी मध्यवर्गीयांची लगबग दिसून आली. गेल्या दोन दिवसांत ग्राहकांनी खरेदीचा आनंद लुटला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीमुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढालीला वेग आला. शहरातील गांधी मार्ग, गांधी चौक, अशोक वाटिका, वाशिम स्टँड, शहर कोतवाली, टिळक मार्ग, जठारपेठ, सिव्हिल लाइन्स आदी ठिकाणी ग्राहकांची विशेष गर्दी दिसून आली. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

सोने खरेदीची ‘चांदी’
गेल्या दहा वर्षांत सोन्याचे दर कित्येक पटींनी वाढले, तरी सोने खरेदी करणार्‍यांची संख्या कमी झालेली नाही. सोने-चांदी खरेदीला मध्यमवर्गीयांकडून मुहूर्त शोधण्यात येतो. त्यामुळे धनत्रयोदशीनिमित्त सराफा व्यापार्‍यांनी विशेषत: मोठय़ा दुकानदारांनी अनेक योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी झाली होती. अगदी एक गॅ्रम सोन्यापासून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. अंगठी, कानातील टॉप्स, मंगळसूत्र आदी दागिन्यांसह सुवर्ण नाणे खरेदी केले. सोने खरेदीच्या बाजारात सुमारे तीन ते चार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

शहरातील नामांकित सराफा शोरूमचालकांनी पारंपरिक आणि पाश्चिमात्य डिझाइनवर आधारित दागिन्यांची शृंखला विक्रीस उपलब्ध होती. एरवी महागाईने कंबरडे मोडलेले असले तरी या दिवसात जमेल तशी खरेदी करण्यावर सवार्ंचा भर दिसून आला. ग्राहकांनी धनत्रयोदशीला खरेदीचा सुवर्णयोग साधला. आकर्षक दागिने खरेदी करण्याकडे महिलांची पसंती होती. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. सोन्यापाठोपाठ चांदीचीही झळाळी कायम होती. या वर्षी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीचा प्रभाव सोने-चांदीच्या बाजारपेठेवर जाणवला. सोयाबीनचा पैसा शेतकर्‍यांच्या हातात आलेला नाही. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले. धनत्रयोदशी 1 नोव्हेंबरला आल्याने अनेकांचे पगार झालेले नाहीत. या सर्वांचा विपरीत परिणाम सोने चांदीच्या विक्रीवर झाला.

मुहूर्तावर घराचे स्वप्न
निवासी संकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी बिल्डर्सनीदेखील धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनेक योजना जाहीर केल्या. त्याचाही लाभ ग्राहकांनी घेतला. अनेकांनी पूर्वीच घर, फ्लॅट बुकिंग करून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गृहप्रवेशाचे स्वप्न पूर्ण केले, तर काही ग्राहकांनी बुकिंग करण्याचा आनंद घेतला.

इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये तेजी
धनत्रयोदशीनिमित्त कॅमेरे, वॉशिंग मशीन, एसी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांनी भर दिला. अनेक नागरिकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घरी आणल्या. मोबाइल खरेदी करण्याकडे युवा वर्गाचा विशेष कल होता. विविध कंपन्यांच्या स्मार्ट फोनला सर्वाधिक मागणी होती.