आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानेश्वर वानखडे हत्याकांड पूर्वनियोजित; पोलिसांचा न्यायालयात युक्तिवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ज्ञानेश्वर र्शीकृष्ण वानखडे हत्याकांडाचा पूर्वनियोजित कट रचला होता, असे पोलिसांनी 15 नोव्हेंबरला न्यायालयात सांगितले. पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने पोलिसांनी आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले. या वेळी पोलिसांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी करताना अनेक मुद्दय़ांना स्पर्श केला.

माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे हनुमान ग्रामविकास प्रतिष्ठानचे कार्यालय आहे. 9 नोव्हेंबरला त्यांचा स्वीय सहायक ज्ञानेश्वर वानखडेंशी बिडकर यांच्या कार्यालयातील कर्मचारी शैलेश राठोड आणि त्याचा भाचा यशपाल जाधवने वाद घालून त्यांच्यावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी शैलेश राठोड आणि यशपाल जाधव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

न्यायालयीन कोठडी
ज्ञानेश्वर हत्याकांडातील आरोपी शैलेश राठोड आणि यशपाल जाधव यांना 15 नोव्हेंबरला पोलिसांनी प्रथम र्शेणी न्यायदंडाधिकारी हुसेन यांच्या न्यायालयात हजर केले. सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढीची मागणी केली. आरोपींनी रचलेल्या कटात आणखी कोण सहभागी आहेत काय, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. सरकारी वकील गजानन पाटील यांनीही तपास आवश्यक असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. मात्र, आरोपींचे वकील डी. आर. खुराणिया यांनी पोलिस कोठडीला विरोध करत तपासासाठी पोलिस कोठडी आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.