आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपामुळे खामगावातील रुग्णसेवेवर परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - येथील शासकीय रुग्णालयातील 37 डॉक्टरांपैकी केवळ 10 डॉक्टर रुग्णालयात कार्यरत असून, उर्वरित डॉक्टर्स संपावर गेल्याने रुग्णसेवेवर विपरीत परिणाम झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश सिरसाट यांनी दिली. गरिबांना अल्पदारात व चांगली सेवा सुविधा मिळावी, यासाठी शासनाने रुग्णालये सुरू केली आहे. खामगाव येथील शासकीय रुग्णालयात खामगाव, जलंब, लाखनवाडा, पहुरजिरा, मावता, माटरगाव, नांदुरा, जळगाव जामोदसह विविध गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. डॉ. सिरसाट यांनी दिलेल्या महितीनुसार या रुग्णालयाच्या बाहय रुग्ण विभागात दररोज 400 ते 450 रुग्ण येत आहेत. या रुग्णालयात पहिलेच डॉक्टरांची संख्या कमी असून, 17 डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले आहे.

त्यामुळे याचा विपरित परिणाम झालेला आहे. डॉक्टरांअभावी ज्या प्रमाणात त्यांना सेवा मिळावयास पाहिजे, त्या प्रमाणात सेवा मिळत नाही. तशी ओरड रुग्णांकडून होत आहे.
वैद्यकीय अधीक्षक सिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दवाखान्यात केवळ 10 डॉक्टर्स कार्यरत आहेत. त्यामध्ये 5 क्लास वन डॉक्टर, 3 आयुर्वेदिक युनानी डॉक्टर्स, 2 अर्बन हेल्थचे मेडिकल ऑफीसर यांचा समावेश आहे. संपात असलेल्या 17 डॉक्टरामध्ये 9 रेग्युलर व 8 कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या डॉक्टरांचा समावेश आहे. मॅग्मो संघटनेतर्फे 1 जुलैपासून बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन कधी मागे घेण्यात येईल, याकडे रुग्णाच्या नातेवाइकांच्या नजरा लागल्या आहे.
160 वैद्यकीय अधिका-यांनी दिले राजीनामे
डॉक्टरांच्या मागण्यांबाबत नुकतेच जिल्ह्यातील 160 वैद्यकीय अधिका-यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे मंगळवार 1 जुलै रोजी आरोग्य संचालक सतीश पवार यांच्याकडे फॅक्सने पाठवले आहेत. सामूहिक राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयातील सेवा कोलमडली आहे. दुसरीकडे मागील तीन दिवसांपासून डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे, मात्र अद्यापही शासनाने याची दखल न घेतल्याने मॅग्मो संघटनेच्या सदस्यात नाराजीचे वातावरण आहे.

ग्रामीण भागातून 400 पेक्षा अधिक येतात रुग्ण
खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज ग्रामीण भागातील जवळपास 400 पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात. मात्र मागील तीन दिवसापासून डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. वेळेवर उपचार होत नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांचा वेळ, पैसा खर्च होत आहे. दवाखान्यात डॉक्टर नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातून येणारे रुग्ण यामुळे त्रस्त झाले आहे.