आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या संपाने घेतला मातेचा जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू झाल्याची घटना 3 जुलै रोजी रात्री 11 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात घडली. या घटनेने संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी ड्युटीवरील कर्मचा-यांना मारहाण करत डॉक्टरांच्या संपामुळेच आमच्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत चांगलाच गोंधळ घातला.

बार्शिटाकळी येथील आजिमा परवीन अब्दुल राजीक या महिलेला शुक्रवारी रात्री 10.30 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, तिच्या पोटामध्ये कळा यायला लागल्या. डॉक्टरांचा संप असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. विवेक कराळे यांना प्रसूती करण्यासाठी बोलावले. दरम्यान, बराच विलंब झाला. डॉक्टर आल्यावर त्या महिलेची प्रसूती करण्यात आली. प्रसूती होऊन मुलगी झाली. पण, माता मात्र दगावली. या घटनेने संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रसूती कक्ष क्रमांक 2 मध्ये उपस्थित काही कर्मचा-यांना मारहाण केली. डॉक्टरच्याही अंगावर ते गेले. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने प्रकरण आटोक्यात आले.

डॉक्टरांच्या आंदोलनाचा फटका : जिल्हा स्त्री रुग्णालयात दैनंदिन 300 महिला रुग्णांवर उपचार केले जातात. साधारणपणे 50 ते 60 प्रसूती रोज केल्या जातात. सद्य:स्थितीत वैद्यकीय अधीक्षिका व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक वगळता एकही डॉक्टर कार्यरत नाही. त्यामुळे परिचारिकांच्या भरवशावर दवाखाना सुरू आहे. जर डॉक्टर हजर असते, तर त्या मातेचा मृत्यू झालाच नसता, ही वास्तविकता आहे.

संप सुरूच राहणार : न्याय मिळेपर्यंत संप सुरूच राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजयसिंग जाधव यांनी दिला आहे. शासन जोपर्यंत मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. या आंदोलनात डॉ. चिमणकर, डॉ. तोरणेकर, डॉ. भावना हाडोळे, डॉ. कराळे, डॉ. देशमुख, डॉ. पाटील, डॉ. मेहता, डॉ. बिपटे, डॉ. मेश्राम यांच्यासह 80 वैद्यकीय अधिकारी उपोषणास बसले आहेत.
24 तासांचा अल्टिमेटम
- आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी दिलेल्या आदेशानुसार संपात सहभागी सर्व वैद्यकीय अधिका-यांना व मॅग्मो संघटनेच्या पदाधिका-यांना सेवेवर रुजू होण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. याकरिता त्यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.’’ डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला.

आदेशाप्रमाणे कारवाई करू
आरोग्य संचालनालयातर्फे मिळालेल्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत डॉक्टरांना रुजू होण्याबाबत सांगितले आहे. मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश अद्याप प्राप्त नाहीत. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करू.’’ डॉ. अविनाश लव्हाळे, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला.

फोटो - वैद्यकीय अधिका-यांचा संप सुरू असल्याने अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येतील, अशाप्रकारचा फलक जिल्हा स्त्री रुग्णालयात लावण्यात आला आहे.