आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन : डॉक्टरांविरुद्ध मेस्मा लावण्यास टाळाटाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्वत्र सुरू असलेल्या वैद्यकीय अधिका-यांच्या संपात जिल्ह्यातील 50 च्या जवळपास डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयासह ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा प्रभावित झाली आहे. सेवेत असताना संपावर गेलेल्या या डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे, तर दुसरीकडे डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट- अ संघटनेच्या निर्णयानुसार राज्यातील वैद्यकीय अधिका-यांनी 1 जुलैपासून कामबंद असहकार आंदोलन पुकारले आहे. सहावा वेतन आयोग लागू करावा, पूर्वलक्षी लाभ मिळावा, अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिका-यांना व दंतचिकित्सकांना कायम करावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज पाच दिवसांचा कालावधी उलटला, तरी कोणताही तोडगा निघताना दिसत नाही. शासनाकडून आंदोलनाची दखल घेतल्या जात नसल्याचे चित्र आहे. 24 तासांचा अल्टिमेटम संपकरी डॉक्टरांना देण्यात आला होता. 4 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 24 तास उलटून गेले, तरी संपकरी डॉक्टरांविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा महाराष्ट्र शासनाकडून झालेली नाही. या सर्व परिस्थितीवरून शासनाचे अधिकारीच संपकरी डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.

पर्यायी व्यवस्था नाही
रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था लावण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे. जर पर्यायी डॉक्टर उपलब्ध असता, तर जिल्हा स्त्री रुग्णालयात 3 जुलै रोजी प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झालाच नसता. राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी हे प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी काम करत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.

वर्ग 1 संवर्गाचाही आंदोलनाला पाठिंबा
सार्वजनिक आरोग्य सेवेंतर्गत येणा-या जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग अधिकारी संघटनेही पाठिंबा दंर्शवला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे अव्वर सचिव आरोग्य व आरोग्य मंत्री यांना देण्यात आले आहे.

राजपत्रित अधिकारी महासंघाचाही पाठिंबा
वैद्यकीय अधिका-यांच्या संपाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाबाबत सक्रिय पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी 8 जुलै रोजी जिल्हानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी बैठका घेण्यात येणार असून, जाहीर पाठिंबा द्यावा, अशी माहिती मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष इंजिनिअर मनोहर पोकळे, सरचिटणीस समीर भटकर यांनी दिली आहे.