आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctors Forcing For Costly Medicines Rather Than Generic Medicines

‘कमिशन’साठी मांडला जातोय रुग्णांच्या वेदनांचा काळाबाजार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- विशिष्ट औषधांची सक्ती करून डॉक्टर व मेडिकल दुकानदारांनी रुग्णांची लूट चालवली आहे. डॉक्टरांनी रुग्णांना विशिष्ट औषधांची सक्ती न करता औषधांनादेखील पर्याय देण्याचा डोस डॉक्टरांना 2009 मध्ये मेडिकल कौन्सिलने दिला होता. मात्र, डॉक्टरांवर हा डोस निष्फळ ठरला असून, रुग्णांच्या वेदनांचा बाजार मांडणे सुरूच आहे.

वैद्यकीयदृष्ट्या अकोल्यात मोठी उलाढाल होते. नागपूरनंतर सर्वाधिक ‘हायफाय’ हॉस्पिटल अकोल्यात आहेत. त्यामुळे पश्चिम विदर्भातून येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. मागील काही वर्षांमध्ये उपचार खर्चात सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये औषधांचा मोठा वाटा आहे. एकाच आजारावर अनेक औषधांचे पर्याय उपलब्ध असताना महागडी औषधच घेण्याची सक्ती डॉक्टरांकडून करण्यात येते. औषध दुकानदार बेसुमार नफ्यासाठी विशिष्ट औषधे रुग्णांच्या माथी मारतात, अशी ओरड होऊन केमिस्टवर त्याचे खापर फोडले जात़े मात्र, विशिष्ट एका कंपनीचे औषध घ्या, अशी सक्ती करणार्‍या डॉक्टरांकडे डोळेझाक केली जात़े या दुकानदारीला लगाम घालण्यासाठी सन 2009 मध्ये इंडियन मेडिकल कौन्सिलने डॉक्टरांना औषधांना पर्याय देण्याचे सक्त निर्देश दिले होत़े किती डॉक्टर या आदेशाची अंमलबजावणी करतात, हा एक संशोधनाचा विषय ठरत आह़े मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, हायपर टेंशन, उच्च रक्तदाब, हृदयरोग हे आजार झाल्यावर औषधांचे पाकीट आयुष्यभरासाठी जवळ ठेवणे गरजेचे होऊन बसते. अशा रुग्णांना आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने औषधांचा डोस घ्यावा लागतो. जटील आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी उपचार खर्चीक होत आहे. त्यामुळे मेडिकलने देशभरातील डॉक्टरांना रुग्णांच्या फायद्यासाठी जेनेरिक औषधांच्या पर्यायाचा सल्ला द्यावा, असे निर्देश दिले होते. डॉक्टरांनी औषध देताना कंपनीचे नाव न लिहिता ड्रगचे नाव लिहावे, त्या औषधाचे ब्रँड नेम आणि जेनेरिक पर्यायही नमूद करावा, असे आदेशात नमूद होते. ब्रँड औषधे महाग असल्याने त्यासारख्या गुणधर्माची शेकडो जेनेरिक औषधे बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी जेनेरिक औषधे ‘प्रिस्काइब’ करावीत, असे मेडिकल कौन्सिलने सुचवले होते. मात्र, त्यावर अंमलबजावणी करण्याऐवजी डॉक्टरांनी या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे. शेवटी नफेखोरीसंदर्भात मेडिकल संचालकांकडे बोट दाखवण्यात डॉक्टर मंडळी धन्यता मानतात. यासर्व प्रकारामुळे रूग्णांची आर्थिक लूट होत असून, यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे हा प्रकार शहरामध्ये फोफावत आहे.


उपलब्धतेनुसार पर्याय देण्यात येतात
रूग्णांना उपलब्धतेनुसार औषधांचा पर्याय देण्यात येतो. मात्र, सर्वच औषधांना पर्याय देणे शक्य नसते. औषधांसंदर्भात कमिशनचा प्रश्‍नच नाही. आजारानुसार योग्य औषध देण्यात येते.’’

डॉ. सत्येन मंत्री, सचिव , इंडियन मेडिकल असो.अकोला.