आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात होणार पहिले डॉग होस्टेल; डॉगीची चिंता सोडा, बिनधास्त बाहेरगावी जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आठवडाभर बाहेरगावी जायचे आहे, पण डॉगीला कुठे ठेवायचे? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. पण, आता काळजी करायची गरज नाही. कारण अकोल्यात लवकरच डॉग होस्टेल सुरू होत आहे.

शहरामध्ये बहुतांश नागरिकांकडे लेब्रेडॉल, जर्मनशेपर्ड, बॉक्सर, रॉट व्हीलर, पामोरेरियन, ग्रेड डेन, डॉबरमॅन अशा विविध जातीची कुत्रे पाळली जातात. कुत्रे पाळणे आणि त्याची काळजी घेण्यापेक्षा कठीण जर कुठले काम असेल, तर ते बाहेरगावी जाताना लाडक्या डॉगीला कुठे ठेवायचे याचे. श्वानप्रेमींना पडणार्‍या या प्रश्नाचे उत्तर पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने शोधले आहे. मुंबई, चेन्नई या महानगरामधील डॉग होस्टेलची संकल्पना असून, अमरावतीकडे राष्ट्रीय महामार्गावरील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला लागूनच असलेल्या शैक्षणिक पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या आवारात डॉग होस्टेलचे काम पूर्णत्वास येत आहे. अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. वाय. कोलते यांच्या मार्गदर्शनात चिकित्सालयामध्ये डॉग होस्टेलची निर्मिती होत आहे. या ठिकाणी 10 कुत्र्यांना ठेवता येईल, असे स्वतंत्र 10 पिंजरे तयार करण्यात आले आहेत.

श्वानप्रेमींची संख्या अधिक
पाळीव प्राणी हॉस्टेलमध्ये ठेवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात श्वानप्रेमींची संख्या सर्वाधिक आहे. बर्‍याच मंडळींकडे महागडे श्वान आहेत. मात्र, श्वानप्रेमींची पंचाईत होते जेव्हा त्यांना बाहेरगावी जायचे असते.
-डॉ. ए. वाय. कोलते, सहयोगी अधिष्ठाता

नावीन्यपूर्ण उपक्रम
श्वानप्रेमींची गरज लक्षात घेता आम्ही हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. तज्ज्ञ पशू डॉक्टरांच्या निगराणीत नागरिकांच्या लाडक्या कुत्र्यांची काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
-डॉ. सुनील वाघमारे, चिकित्सालय अधीक्षक.