आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे ज्ञान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, डॉ. पार्थसारथी शुक्ल यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जगाच्यापाठीवर कोठेही गेलात तरी तुमचे ज्ञान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. यादृष्टीने युवकांमध्ये वाचनाची आवड वाढावी, ज्ञानार्जन व्हावे म्हणून महाराष्ट्र नव निर्माण सेनेने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. अशा विधायक उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन डॉ. पार्थसारथी शुक्ल यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिवाळी अंक प्रदर्शनाचा जठारपेठेतील गुप्ते मार्गावर माणिक संकुलात रविवारी सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. सोमवारपासून वाचकांना जगदीश गडकरी यांच्याकडे दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘दिव्य मराठी’चे कार्यकारी संपादक सचिन काटे होते. प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शंकरराव वाकोडे, शरदराव आढे, अनंतराव मायी व्यासपीठावर होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले प्रास्ताविकात म्हणाले, अंकांच्या किमती वाढल्या म्हणून चोखंदळ वाचक दिवाळी अंक वाचनापासून वंचित राहू नये, युवकांना वाचनाची साधने उपलब्ध असली तरी दिवाळी अंक वाचनाचा आनंद त्यांना मिळावा या उद्देशाने उपक्रम हाती घेतला आहे. पुढील दोन-अडीच महिने उपक्रम सुरू राहणार आहे. वाचकांनी दोन दिवसात अंक वाचून आणून द्यावा, असे अपेक्षित आहे. प्राचार्य चापके म्हणाले, वाचनाची आवड निर्माण करणे काळाची गरज आहे. मनसेच्या उपक्रमाचे अभिनंदन करतो. डॉ. वाकोडे यांनी, चांगल्या कामासाठी समाजाने उभे राहावे, असे आवाहन केले. ‘दिव्य मराठी’चे कार्यकारी संपादक सचिन काटे म्हणाले, की सोशल मीडिया वाचन संस्कृती विस्कळीत करण्याचे काम करीत असली तरी प्रिंट मीडियाने विश्वासार्हता कायम ठेवली आहे. मनसेने नव्या पिढीला दिवाळी अंकाची ओळख करून देण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम अनुकरणीय आहे. समाजात निर्माण झालेल्या उद्विग्नेमागे स्वार्थलोलुपता कारणीभूत आहे, असे सांगून त्यांनी याला छेद देण्यासाठी असे उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

सुरुवातीला रणजित राठोड, राजेश पिंजरकर, राजेश निनावे, राकेश शर्मा, विकास मोळके, आशीष कुळकर्णी यांनी अतिथींचे स्वागत केले. या उपक्रमासाठी सहकार्य करणारे जगदीश गडकरी, तर राजेश पिंजरकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार झाला. सूत्रसंचालन ललित यावलकर यांनी केले तर आभार रणजित राठोड यांनी मानले.