आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. मुंढे, नवले सक्तीच्या रजेवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कापशी हे हरिभक्तपरायणाचे गाव आहे. येथील लोकांना मी आधीपासून ओळखतो. असे असताना पोलिसांनी केलेली कारवाई ही अन्यायकारक आहेच. गावाची पाहणी करताना जे दिसून आले त्यावरून पोलिसांची अमानुषता दिसून येते. असाही प्रसंग आपल्याच लोकांवर येईल मला त्यासाठी येथे यावे लागेल, असा विचारही मनात आला नाही. जे झाले ते दुर्देवी, अक्षयतृतीयेची रात्र ही काळरात्रच ठरली, असे सांगतांना गृहराज्यमंत्री हळहळले. पहिली कारवाई म्हणून त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांना सक्तीच्या रजेवर पाठवले.

गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी कापशी येथे भेट दिली. या वेळी सर्व गावातील नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची करुण कहाणीच मंत्री महोदयांना सांिगतली. तसेच रस्त्यांवर पडलेली क्षतिग्रस्त वाहने, तुटलेल्या दारे खिडक्यांची पाहणीसुद्धा या वेळी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या प्रागणांत ग्रामस्थांशी संवाद साधताना राज्यमंत्री डॉ. पाटील भावुक झाले होते. ते म्हणाले की, झालेली कारवाई ही निंदनीय आहे. जुगाराचा छापा टाकण्यासाठी किती पोलिस आले होते. कुणाच्या आदेशावरून होते. त्यात काही प्रशिक्षणार्थी पोलिस होते काय. कारवाईसाठी आलेले अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात हे गाव येते काय, त्यांनी केलेली कारवाई नियमात बसते काय, या सगळ्या बाबींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये कितीही मोठा आयपीएस अधिकारीही दोषी आढळला, तर त्याची गय केल्या जाणार नाही. कारवाई ही अटळ आहे. गावकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांनी गावातील पाहणीच्या आधारावर डॉ. प्रवीण मुंढे रत्नाकर नवले यांना सेवा, कर्तव्यापासून दूर केल्याची माहिती दिली आहे. अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई करणार असल्याचा विश्वास त्यांनी गावकऱ्यांना दिला. आमदार हरीश पिंपळे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार गुलाबराव गावंडे, डॉ. जगन्नाथ ढोणे, नारायणराव गव्हाणकर, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रा. संजय खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. मोतीसिंग मोहता, जि. प. सदस्य चंद्रशेखर पांडे, नगरसेवक आशिष पवित्रकार, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शैलेश बोदडे यांची उपस्थिती होती.

दुष्काळातही लाखोंचा जुगार
जिल्हाधिकारीअरुण शिंदे यांनी ग्रामस्थांची विचारपूस केली. या वेळी गावकऱ्यांनी त्यांना सांिगतले की, जुगार सहा ते सात लाख रुपयांचा होता. हे ऐकून जिल्हाधिकारी अवाक् झाले. एवढा मोठा जुगार चालत असेल, तर कशाचा दुष्काळ, असे ते म्हणाले. आमच्या गावातील लोक जुगार खेळत नाहीत, तर बाहेरच्या गावचे लोक येऊन जुगार खेळतात, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

साहेब, आता म्हैस दूध देत नाही
पाहणीकरताना अकोल्याचे पालकमंत्री गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे सूर्यभान यांच्या म्हशीच्या गोठ्याकडे वळले. त्यांच्या म्हशीला पोलिसांनी मारहाण केली, असे सांगताना त्यांना रडू कोसळले आणि म्हणाले साहेब, म्हशीला एवढे मारले की, म्हैस त्या दिवसापासून दूधच देत नाही हो.

माझ्याच घरी पाणी प्यायले अन् मारले
कापशीयेथील ७० वर्षीय अन्नपूर्णाबाई चतरकार रडत रडत म्हणाल्या की, साहेब माझ्या घरी सात आठ पोलिस रात्री वाजता आले. त्यांनी पाणी मागितले. मी त्यांना पाणी पाजले. मात्र, त्यानंतर त्यांनी आम्हालाच काठ्यांनी मारहाण केली. पोलिसांनी अमानुषपणे आम्हाला मारहाण केली.

नुकसानीच्या सर्व्हेचे तहसीलदारांना आदेश
कापशीयेथील नागरिकांच्या वाहनांची, घरांची आणि इतर मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे, त्याचे सर्व्हे करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री पाटील यांनी तहसीलदारांना दिले आहेत. सर्व्हे झाल्यानंतर नुकसानभरपाई त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर नुकसानग्रस्तांना मदत देणार असल्याचे ते डॉ. पाटील म्हणाले.

पद आज आहे, उद्या नाही
डॉ.पाटील म्हणाले की, जे पत्ते खेळत होते त्यांना पकडा, दुमत नाही. माझे येथील नाते पूर्वापार आहे. दोन महिन्यांच्या मुलांपासून तर पॅरॉलिसिस झालेल्या वृद्धांना झालेली मारहाण झाल्याचे दिसते. संवेदनहीन कारवाई झाल्याचे दिसते. चौकशी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पद आज आहे उद्या नाही, त्याची मी पर्वा करत नाही.

मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, पोलिस महानिरीक्षकांना भेटलो. त्यांना घटनेची तीव्रता सांिगतली. लगेच विशेष पोलिस महानिरीक्षकांनी चौकशी समिती नेमली, चौकशी सुरू केली आहे. आता मी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. त्यात चौकशीच्या अहवालात विसंगती आढळली, तर न्यायालयीन चौकशी करू. गुप्त यंत्रणेमार्फत चौकशी करणार असून, तीन दिवसांत चौकशी होईल. त्याच्या आधारे कारवाई होणार असल्याची माहिती डॉ. रणजित पाटील यांनी दिली.