आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drama And Communication Workshop Issue At Akola, Divya Marathi

फडकंही मळकं, मडकंही मळकं, फडक्याने ..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘फडकंही मळकं, मडकंही मळकं, फडक्याने मडक्याचा मळ पुसायला जावा, तर फडक्याचा मळ मडक्याला आणि मडक्याचा मळ फडक्याला..’ अशा वाक्यांचा सराव करून जिभेला संवादफेकीचे वळण लावण्यासाठी टंगट्विस्टर तसेच थिएटर गेम्सचा उपयोग करून शारीरिक चपळता कशी प्राप्त करता येईल, याचा सराव येथे सुरू असलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींनी 28 मे रोजी दुसर्‍या दिवशी केला.
नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र व पत्रकार कॉलनी नवयुवक क्रीडा प्रसारक बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित सिद्धी गणेश प्रॉडक्शन यांच्यातर्फे दहा दिवसीय नि:शुल्क शिबिरास मंगळवारपासून येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात सुरुवात झाली. बुधवारी, 28 मे रोजी शिबिराच्या दुसर्‍या दिवशी सकाळी नटराज डान्स अँकेडमीचे विशाल डिक्कर यांनी शिबिरात सहभागी शाळा-महाविद्यालयांतील प्रशिक्षणार्थींना शारीरिक हालचाली एक्सरसाइज करवून घेतल्या. नंतर मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील प्रा. अमोल देशमुख यांनी शिबिरार्थींकडून थिएटर गेम्स व शिबिरार्थींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच जिभेचा व्यायाम म्हणजे टंगट्विस्टरचा सराव करून घेतला तसेच थिएटर गेम्सचा उपयोग करून शरीराला चपळता कशी प्राप्त करता येईल, याचा सराव केला. काही विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करवून घेतली. त्यानंतर कल्पनाशक्तीचा वापर करून संवादाची, प्रसंगाची निर्मिती, आवाज जोपासना कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले.
नाटकाचा आत्मा म्हणजे संवादफेक. या संवादफेकीचे बाळकडू शिबिरार्थींना मिळावे, या उद्देशाने प्रशिक्षणार्थींकडून कठीण शब्द उच्चारण, स्पष्ट उच्चाराचा सराव करवून घेतला. प्रभावी संवादफेक कशी करावी, संवाद रचना, आवाजातील चढउतार, आवाजातील लय याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन तसेच नाटकातील दृश्यबांधणी, रंगमंचाचा समतोल, अंगचलन (बॉडी मुव्हमेंट), क्रिया व्यापार (अँक्टिंग कृती) यांचेही मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात आज दुसर्‍या दिवशी 90 प्रशिक्षणार्थ्यांनी हजेरी लावली. यात 15 ते 30 वयोगटातील नाट्यहौशींचा समावेश आहे. शिबिराचे आयोजक सचिन गिरी, अनिल कुलकर्णी, उदय दाभाडे यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. 30 मेपर्यंत मुंबईचे प्रा. अमोल देशमुख शिबिरात सहभागी रंगकर्मींना मार्गदर्शन करणार आहेत.