आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवर्षणाची भीती; हालचाली सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - पाऊस नसल्याने जिल्ह्यात अवर्षणसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘गिअरअप’ व्हावे, अशा सूचना ग्रामविकासमंत्र्यांनी दिल्या असतानाच 3 जुलै रोजी जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रशासनाने या अनुषंगाने सज्ज राहावे, असे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागातील पाणीटंचाईचा आढावा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जीवन प्राधिकरणकडून घेण्यात येत असून, त्यांच्याकडून माहिती मिळाल्यावर जिल्ह्याचा आकस्मिक टंचाई कृती आराखडा आकारास येणार आहे.
संपूर्ण जून महिना काही अपवाद वगळता कोरडा गेल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. अपवाद वगळता जिल्ह्यातील साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. जुलै महिन्याच्या मध्यावर पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज असला, तरी प्रत्यक्षात पाऊस पडेपर्यंत दिलासा मिळणार नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला संभाव्य अवर्षणसदृश स्थितीला सामोरे जाण्यासाठी हालचाली करणे क्रमप्राप्त आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा आकस्मिक कृती आराखडा बनवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. या अनुषंगाने जुलै महिन्याअखेरही हीच स्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यातील जवळपास 34 गावांना 40 टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. 138 गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहीत कराव्या लागण्याची शक्यता आहे.

सहा गावांमध्ये 14 टँकर
जिल्ह्यात सहा गावांमध्ये 14 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. हीच परिस्थिती राहिल्यास बुलडाणा तालुक्यात दहा, चिखली दोन, देऊळगावराजा पाच, लोणार, खामगाव प्रत्येकी एक, मेहकर, सिंदखेडराजा, शेगाव प्रत्येकी दोन, मोताळा नऊ, मलकापूर व नांदुरा प्रत्येकी तीन टँकर लागतील. आकस्मिक कृती आराखड्यात या गावांचा समावेशाच्या हालचाली सुरू आहेत.

प्रकल्पात 32 टक्के जलसाठा
जिल्ह्यातील तीन मोठ्या, सात मध्यम व 74 लघू प्रकल्पांमध्ये 32 टक्के जलसाठा असल्याची माहिती आहे. जवळपास 180 दशलक्ष घनमीटर एवढा हा जलसाठा असून, यातील पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सात नगरपालिका व 62 गावांसाठी मागील वर्षी 20 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले होते.

प्रशासनाने ‘गिअरअप’ व्हावे
अवर्षणसदृश स्थिती पाहता प्रशासनाने संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी ‘गिअरअप’ व्हावे, असे निर्देश ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी 1 जुलै बुलडाणा येथे आले असताना दिले. कृषी दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी प्रशासनाला अवर्षणसदृश स्थितीसाठी सज्ज व्हावे, असे संकेतच दिले. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनानेही हालचाली सुरू केल्या आहेत.

प्रकल्पातील पाणी पिण्यासाठीच राखीव
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या पाण्याचा शेती सिंचनासाठी उपयोग झाल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास संबंधितांचे वीजपंपही जप्त करण्यात येतील, असे आदेशच जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी 2 जुलै रोजी दिले आहेत. त्या अनुषंगाने शेतक-यांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सोबतच वीज वितरण, पाटबंधारे विभाग, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पालिकांना पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त उद्भवातून पाण्याचा उपसा होत असल्यास तो बंद करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येणार आहे.