आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंताग्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जून अखेरही जिल्ह्यात अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, हंगामपूर्व लावलेल्या साडेसात हजार हेक्टरवरील कपाशीलाही याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामस्वरूप कृषी विभागाचेही नियोजन आता कोलमडण्याच्या मार्गावर आहे. त्यानुषंगाने कृषी विभागाचीही जून अखेर बैठक होण्याची शक्यता आहे.

गेल्या चार वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा होत असून, प्रारंभीच्या तीन वर्षांमध्ये अवर्षणसदृश स्थितीमुळे शेतकर्‍यां ना मोठा फटका बसला होता. पिण्याच्या पाण्याची समस्याही जिल्ह्यात गंभीर झालेली होती. गेल्या वर्षी वार्षिक सरासरीच्या 138 टक्के पाऊस झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात या पावसाने नुकसान केले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला होता. त्यातच फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे रब्बीच्या पिकांचीही जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर मोठी हानी झाली होती. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटाच्या चक्रातून बाहेर पडू शकलेले नाही.
गतवर्षीच्या पावसामुळे भूजल पातळी जिल्ह्यात चांगली असल्यामुळे या वेळी शेतकर्‍यां ना चांगल्या पिकाची आशा आहे. मात्र, मृग नक्षत्र कोरडे गेले. पुढील नक्षत्रातही पाऊस न पडल्याने उडीद, मूग व ज्वारीचे शेतकर्‍यां चे नियोजन बिघडले आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर साधारणत: पेरणी होत असते. कृषी विभागानेही त्यानुषंगाने नियोजन केले होते. मात्र, वरुणराजाची अवकृपा झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

नव्याने नियोजनाची आवश्यकता
या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नव्याने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. साधारणत: 30 जूनपर्यंत पावसाची वाट बघितली जात असून, त्यादरम्यान पाऊस आल्यास सर्वांनाच दिलासा मिळेल. मात्र, पावसाने फिरवलेली पाठ पुन्हा कायम ठेवल्यास कृषी विभागाचे नियोजनही कोलमडेल. परिणामस्वरूप नव्याने कृषी विभागाकडून नियोजन होण्याची शक्यता असून, त्यानुषंगाने कृषी विभागांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अधिकार्‍यां ची एक बैठक घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
3.2 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 23.2 मि.मी. पाऊस पडला असून, गेल्या वर्षी 23 जूनदरम्यान पडलेल्या पावसाशी त्याची तुलना केल्यास हा पाऊस केवळ केवळ दहा टक्के आहे. गेल्या वर्षी याच तारखेला जिल्ह्यात 204.6 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यावरून जिल्ह्यातील एकंदरीत स्थितीचा अंदाज येऊ शकतो.
जलसाठ्यांमध्ये झपाट्याने घट
जिल्ह्यातील जवळपास 91 छोट्या मोठ्या प्रकल्पांमध्ये वर्तमानस्थितीत 187.56 द.ल.घ.मी. जलसाठा असून, त्यामध्येही मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. एका महिन्यात जवळपास 10 टक्क्यांनी या जलसाठ्यात घट झाली असून, हीच परिस्थिती कायम राहिल्यास पाणीटंचाईचेही सावट गडद होण्याची शक्यता आहे.
सव्वा लाख क्विंटल बियाणे घरात
पावसाच्या आशेने शेतकर्‍यां नी वेळेआधीच उसनवारी करून बियाणे व खत घेऊन ठेवले आहे. पाऊस न आल्याने सव्वा लाख क्विंटल बियाणे शेतकर्‍यां च्या घरात पडून आहे. उधारी उसनवारी करून खत व बियाण्यांची शेतकर्‍याने खरेदी केली होती. मात्र, आता ते बियाणे घरात पडून आहे. दोन लाख मेट्रिक टन खतापैकीही बरेच खत शेतकर्‍यां च्या घरात पडून आहे.
नियोजनात बदलाची शक्यता
जिल्हा प्रशासनाने खरिपामध्ये जिल्ह्यात सात लाख 41 हजार 369 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. यामध्ये सोयाबीन दोन लाख 93 हजार 238 हेक्टर, संकरित कापूस दोन लाख 21 हजार 412 हेक्टर, ज्वारी 40,500 हेक्टर, तूर 68,500, मूग-35,646, उडीद-34,731 हेक्टरवर पेरणीबाबतचे नियोजन होते. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्यातही पाऊस न आल्याने कृषी विभागाच्या खरिपाच्या पीक नियोजनात बदलाचे संकेत आहेत.