आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

... तर वापरावे लागेल बाष्पीभवन रोधक तंत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यात अवर्षणसदृश स्थिती निर्माण झाली असतानाच प्रकल्पातील जलसाठ्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. आगामी काळात पावसाने दमदार हजेरी न लावल्यास पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने जलसाठ्यांच्या संरक्षणासाठी बाष्पीभवन रोधक तंत्र वापरण्याची गरज पडणार आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पात जूनच्या मध्यावर जवळपास 185 दलघमी जलसाठा उपलब्ध असून, या पाणीसाठ्यापैकी जवळपास 20 दलघमी पाणीसाठा हा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानुषंगाने संभाव्य अवर्षण स्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रकल्पातील पाण्याचे संरक्षण हा मुद्दा ऐरणीवर येऊ शकतो. त्यातच या कालावधीत उन्हाचा कडाका वाढल्यास प्रकल्पातील जलसाठ्यांच्या बाष्पीभवनाचा वेगही अधिक राहण्याची शक्यता पाहता या पाण्याच्या संरक्षणासाठी बाष्पीभवन रोधक तंत्र वापरण्यावर प्रसंगी भर देण्याची गरज पडू शकते. मे-जून महिन्यादरम्यान पाण्याच्या बाष्पीभवनाचा हा वेग महत्तम म्हणजे सरासरी 8.64 मि.मी. असतो. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याची 25 लाखांची लोकसंख्या पाहता जिल्ह्यातील उपलब्ध जलस्रोतावर प्रसंगी मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाष्पीभवनामुळे अशा परिस्थितीत वाया जाणार्‍या या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. गतवर्षीच्या पावसाशी तुलना करता जिल्ह्यात 22 जूनपर्यंत सरासरी केवळ 23 मि.मी. पाऊस पडला आहे.
प्रकल्पाची खोली, हवेचा वेग महत्त्वाचा
हे बाष्पीभवन रोधक तंत्र ज्या प्रकल्पांची खोली ही अधिक आहे, हवेचा वेग कमी आहे, अशा ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. येळगाव धरणातील पाण्यावर आठ ते दहा वर्षांपूर्वी या तंत्राचा वापर करण्यात आला होता. मात्र, प्रकल्पाची खोली व वेगवान हवेमुळे त्या वेळी या प्रयोगास फारसे यश मिळाले नव्हते.
अ‍ॅक्वा आर्मर, अ‍ॅक्वाटीन उपयुक्त
मे-जून महिन्यात पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. पाण्याचे होणारे हे बाष्पीभवन टाळण्यासाठी त्यावर अ‍ॅक्वा आर्मर तथा अ‍ॅक्वाटीन लिक्विड टाकून या पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. या लिक्विडमुळे पाण्यावर सायीसारखा तवंग निर्माण होऊन बाष्पीभवनाशी निगडित घटकांचा पाण्याशी ते थेट संपर्क होऊ देत नाही. परिणामस्वरूप पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग मंदावून तो जवळपास 45 ते 50 टक्के कमी होता. बुलडाणा शहरास पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वी हा प्रयोग करण्यात आला होता.
सन 2013-14 चा बुलडाणा जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा हा अवघा पाच कोटी रुपयांचा होता. सन 2012-13 चा टंचाई कृती आराखडा हा 17 कोटी रुपयांचा होता. त्यामुळे अवर्षणाची स्थिती प्रत्यक्षात उद्भवल्यास टंचाई कृती आराखडा तातडीने तयार करण्याची गरज निर्माण होऊ शकते.