आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाेकेदुखी ठरलेल्या कचरामुक्तीच्या उच्चाटनासाठी प्रशासनही सरसावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराच्या अस्वच्छतेस कचरा कारणीभूत ठरतो. घरातील, प्रतिष्ठानांतील हा कचरा जर रस्त्यावर आलाच नाही त्यातून बायोगॅस निर्मिती केली, तर ही बाब शहराची स्वच्छता राखण्यास मदत करणारी आहे. त्यामुळेच ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती प्रकल्पात लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे.
या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून, ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती ही चळवळ शहरात राबवण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला असून, शहरातील मंगल कार्यालये, हॉटेल्स, भोजनालय आदींना ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती प्रकल्प राबवण्याची सक्ती करण्याचा निर्णय आयुक्त सोमनाथ शेट्ये यांनी घेतला आहे.
ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती होऊ शकते. ही कशी होते? यातून नेमका कोणता फायदा होतो? तसेच हा प्रकल्प प्रत्येकाने राबवल्यास शहरात कचराच दिसणार नाही, ही बाब प्रत्येकाच्या लक्षात यावी, यात लोकसहभाग वाढावा, या हेतूने प्रशासनाने ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती प्रकल्प कार्यशाळा महापालिका कार्यालय परिसरात नुकतीच घेतली. कार्यशाळेला हॉटेल व्यावसायिक, नागरिक कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती.

कार्यशाळेत ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प राबवणारे अशोक तोष्णीवाल त्यांचे चिरंजीव संदीप तोष्णीवाल यांनी कार्यशाळेला उपस्थित नागरिकांना ओल्या कचऱ्यातून बायोगॅस कसा तयार केला जातो. याचे प्रात्यक्षिक दाखवले. घरात उरलेले शिळे अन्न, भाजी चिरताना उरणारा उर्वरित भाजीपाला, केळाची साल, खराब झालेला टमाटा, वांगी, बटाटा आदी सर्व प्रकारचा भाजीपाला बारीक करून पाण्यात मिसळून बायोगॅसच्या टाकीत कसा टाकायचा, याबाबत माहिती उपस्थितांना दिली. यामधून मिळणारा गॅस हानिकारक कसा नाही? याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचेे निरसन संदीप तोष्णीवालने केले.

संदीप तोष्णीवाल म्हणाले की, घरातील कचरा आपण रस्त्यावर फेकतो. तो सडतो, त्याची दुर्गंधी पसरते यातूनच आरोग्य बिघडते. परंतु, प्रत्येकाने बायोगॅसचा उपयोग केल्यास आजार पसरवणारा हा ओला कचरा किती लाभदायक आहे, याचा अनुभव आपल्याला येईल.

आपल्या घरात दोन प्रकारचा कचरा निघतो, ओला कोरडा. यांतील ओला कचरा घरातच राहील त्यातून बायोगॅस मिळेल. त्यामुळे घरात केवळ कोरडा कचरा राहील. त्यामुळे शहर स्वच्छतेस फार मोठा हातभार लागेल, तसाच प्रत्येकाचा पैसा वाचेल. गॅस सिलिंडर मिळण्यासाठी होणाऱ्या मानसिक त्रासातून मुक्तता होईल. हा प्रकल्प राबवावा, असे आवाहनही संदीप तोष्णीवाल यांनी केले.

कर्मचाऱ्यांना एक वेतन वाढ

ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती प्रकल्प महापालिकेत कार्यरत जे कर्मचारी आपल्या घरी राबवतील, त्यांना एक वेतनवाढ देण्याची घोषणा आयुक्तांनी केली. तसेच परवाना विभागाने परवाना नूतनीकरणास येणाऱ्या हाॅटेल्स, भोजनावळ, रेस्टाॅरंट, बार व्यावसायिकांना दहा दिवसांत ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची मुदत द्यावी. शहरातील हॉटेल्स, रेस्टाॅरंट, भोजनावळी, बार यातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे डोकेदुखी ठरते. ही बाब त्यांच्या लक्षात आणून देऊन शहर स्वच्छतेसाठी हा प्रकल्प राबवण्याची सूचना करावी, असे आदेशही आयुक्तांनी या वेळी कर्मचाऱ्यांना दिले.

लोक सहभाग अत्यावश्यक

ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती होते, ही बाब अकोलेकरांनीच सिद्ध केली आहे. परंतु, लोकसहभागाशिवाय हा प्रकल्प यशस्वी होणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प राबवणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात काही टक्के सूट देण्याचा निर्णय विचाराधीन असून, या अनुषंगाने महासभेकडे प्रस्ताव पाठवला जाईल.'' सोमनाथ शेट्ये, आयुक्त

झोन निहाय कार्यशाळा

ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती प्रकल्पात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे झोननिहाय ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मितीबाबतच्या कार्यशाळांचे आयोजन करण्याच्या सूचना उपायुक्त माधुरी मडावी यांनी झोन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहर स्वच्छतेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, ही बाब अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या निकाली निघू शकते.
ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवताना अशोक तोष्णीवाल, संदीप तोष्णीवाल.

विसंबून राहू नका

आपण प्रत्येक गोष्टीसाठी महापालिकेवर विसंबून राहणे चुकीचे आहे. दररोजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आव्हानात्मक आहे. प्रशासन काम करत आहे. परंतु, एक नागरिक म्हणून आपलेही कर्तव्य आहे. शिवाजी कॉलेजमध्ये ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. नागरिकांनीही हा प्रकल्प घरोघरी बसवावा.'' -डॉ.सुभाष भडांगे, प्राचार्य