आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-गव्हर्नन्स धोरणाअंतर्गत टाइपरायटर हद्दपार, तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणाअंतर्गत टायपिंग हद्दपार होणार असून टंकलेखन यंत्राऐवजी आता संगणकाचा वापर होणार आहे. पेपरलेस सिस्टिम राबविण्यावर भर दिला जात असल्याने लवकरच राज्यातील शासनमान्य टंकलेखन - लघुलेखन संस्थामध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर 2015पर्यंत वाणिज्य टंकलेखन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील. 12 नोव्हेंबर रोजी पुण्यात पार पडलेल्या राज्य परीक्षा परिषदेच्या बैठकीत ही घोषणा झाली.
झालेल्या निर्णयानुसार, केंद्र, राज्य शासनाची शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक पदी नियुक्तीसाठी कर्मचा-यांना टंकलेखन अर्हता प्राप्त करणे सामान्य प्रशासन विभागाच्या प्रचलित धोरणानुसार बंधनकारक आहे. मात्र, काही वर्षांपासून कामकाजात टाइपरायटरऐवजी संगणकाचा वापर होत आहे. कर्मचा-यांना संगणकाचे ज्ञान असले तरी टायपिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नाही. कामात त्यामुळे परिपूर्णता येत नाही. परिणामी संगणकीय टायपिंग अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात आला आहे. डिसेंबर 2013 पासून तो शासनमान्य संस्थांमध्ये उपलब्ध होईल.
असा असेल संगणकीय टायपिंग शिक्षणक्रम
राज्यातील शासनमान्य टंकलेखन संस्थांमध्ये टायपिंग प्रशिक्षण तसेच परीक्षेसोबतच 6 महिन्यांचे बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग, टायपिंग मराठी, इंग्रजी, हिंदी 30 श.प्र.मि., बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी, इंग्रजी, हिंदी 40 श.प्र.मी. आणि तीन महिन्यांचा स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग फॉर इस्ट्रक्टर्स अँड स्टुडंट्स हा संगणकीय टायपिंग कोर्स असेल. विद्यमान टायपिंग कोर्सशी तो समकक्ष असेल. परीक्षेत 100 गुण असतील. त्यात प्रात्यक्षिक 50 गुणांचे असेल.
वेगवान व पेपरलेस सिस्टिम राबविण्यावर शासनाचा भर
राज्य शिक्षण परिषदेच्या पुण्यात झालेल्या बैठकीनुसार संगणकीय टायपिंग अभ्यासक्रम सुरू होणार आहे. कार्यालयीन कामकाज वेगवान पद्धतीने करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अवलंब सर्व शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थांना करणे बंधनकारक राहील.
- डॉ. विजय काकडे, सदस्य, राज्य परीक्षा परिषद, पुणे