अकोला - राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी उद्यापासून दोन दिवसांच्या संपावर जाणार असल्याने शहरातील आर्थिक उलाढालीला ब्रेक लागणार आहे. बँक कर्मचार्यांच्या दोन दिवसांच्या संपामुळे शहरासह जिल्ह्यातील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प होणार आहे, असा दावा बँक कर्मचारी संघटनांनी केला आहे. या दोन दिवसांमध्ये एटीएम व ऑनलाइन व्यवहारांमुळे सर्वसामान्य बँक ग्राहकांना अंशत: दिलासा मिळणार आहे.
वेतनवाढीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचार्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आह़े रविवारला जोडून सलग दोन दिवस संप होणार असल्याने दोन दिवस आर्थिक व्यवहार थंडावणार आह़े देशव्यापी संपाचा परिणाम शहरातील अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. अनेक वर्षांपासून बँक कर्मचारी संघटनांचा वेतनवाढ, खासगीकरण आदी मुद्दय़ांवर केंद्र सरकारशी संघर्ष सुरू आहे. या संघर्षावर सरकार, वित्त मंत्रालय कोणताही तोडगा काढत नसल्याने 18 डिसेंबरनंतर पुन्हा आता दोन दिवसांचा संप होणार असल्याचे बँक संघटनांनी स्पष्ट केले. या संपाचा फटका उद्योजक, व्यापार्यांसह सर्वसामान्यांना बसणार आह़े बाजारपेठेतील उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. बँक कर्मचार्यांच्या वारंवार होणार्या आंदोलनामुळे व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दीड हजारांवर संपकर्ते
दोन दिवसीय संपात अकोला जिल्ह्यातून दीड हजारांवर अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत़ ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल कन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन या कर्मचारी संघटना संपात सहभागी आहेत़ अधिकारी वर्गातून ऑल इंडिया बँक ऑफिसर्स आर्गनायझेशन, ऑल इंडिया बँक कन्फडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांसह विविध संघटना संपात सहभागी होणार आहेत.
‘यूएफओबीयू’ची निदर्शने
बँक कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या छत्राखाली संप पुकारला आह़े दोन दिवस शहरातील गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेपुढे सकाळी 11 वाजता अधिकारी, कर्मचारी निदर्शने करणार असल्याचे श्याम माईनकर, दिलीप पिटके, यशवंत आंबेकर यांनी सांगितल़े
वारंवार आंदोलन चुकीचे
बँक कर्मचार्यांनी वारंवार आंदोलन करणे चुकीचे आहे. त्याचा फटका नागरिकांना बसतो. त्यांनी याचे भान ठेवावे. संपामुळे ग्राहकांना त्रास होऊ नये.’’ राजेश पाटील, बँक ग्राहक अकोला.
उलाढाल थांबणार
संपामुळे आर्थिक उलाढाल थांबणार आहे. बाजारपेठेवर बँक कर्मचार्यांच्या संपाचा प्रभाव दिसून येईल. संपामुळे कामकाजदेखील प्रभावित होण्याची शक्यता आहे.’’ पंकज कोठारी, अध्यक्ष, क्रेडाई, अकोला.
सर्वसामान्यांना त्रास
संपकरी कर्मचार्यांनी ग्राहकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. यापूर्वी कर्मचार्यांनी संप केला होता. आता पुन्हा संप करण्यामागे कारण काय आहे.’’ सुहास खोले, बँक ग्राहक, अकोला.
विपरीत परिणाम
अर्थव्यवस्थेवर संपाचा विपरीत परिणाम होणार आहे. डिसेंबरमध्ये बँक कर्मचार्यांनी संप केला होता. आता पुन्हा दोन दिवसांचा बँक कर्मचारी संप करणार आहे. त्यामुळे उलाढाल ठप्प होईल. नितीन खंडेलवाल, व्यावसायिक, अकोला.