आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्काराने उत्साह वाढतो, इतरांना प्रेरणाही मिळते- अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- प्रत्येकाला आपले कौतुक झाले पाहिजे, आपल्या कामाची प्रशंसा झाली पाहिजे, असे वाटते. त्यासाठी वयाचे बंधन नाही. व्यक्तीचे कितीही वय झाले, तरी त्याला कौतुक आवडतेच. आपल्या कामाबद्दल आपला गौरव होणे ही अभिमानास्पद बाब आहे. पुरस्कार मिळणे म्हणजे चांगले काम केल्याची एक प्रकारची पावती असते. पुरस्काराने व्यक्तीचा उत्साह तर वाढतोच शिवाय इतरांना आणि त्या व्यक्तीलादेखील चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात शनिवारी झालेल्या प्रा. डॉ. आ. देशपांडे स्मृती जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ३८ व्या राष्ट्रीय अधिवेशनात सायंकाळी अायोजित या सोहळ्यात डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अनिल पडोसी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी त्यांच्या जीवनातील खडतर प्रवासाचे वर्णन केले. जीवनात यश प्राप्त करण्यासाठी जिद्द, चिकाटीला निरंतर प्रयत्नांची जोड असावी लागते, असे मत डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या पत्नी रोहिणी खांदेवाले यांनी व्यक्त केले. या वेळी अधिवेशनातील सहभागी संशोधक, अभ्यासक डॉ. रामदास माहोरे, डॉ. मुक्ता जहागीरदार, डॉ. जे. एफ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. डॉ. राजेंद्र भांडवलकर यांनी प्रास्ताविकात पुरस्काराच्या स्वरूपाविषयी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. युगंधरा देशपांडे, तर अाभार प्रदर्शन डॉ. अविनाश निकम यांनी केले. या वेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी, कार्याध्यक्ष प्रा. चारुदत्त गोखले, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, डॉ. रामेश्वर भिसे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. के. शेख, डॉ. एम. यू. कुलट आदी उपस्थित होते.
परिषदेचीवार्षिक सभा : सायंकाळच्यासमारंभानंतर मराठी अर्थशास्त्र परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील अधिवेशनाबाबत ठरवण्यात आले. परिषदेच्या पुढील वर्षीच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत विचारविमर्श झाला. परिषदेसमोरील महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच अहवाल सादर करण्यात आले. या वेळी २०१४चे परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते