आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एजन्सीतील गोंधळाचा ग्राहकांना बसतोय फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-शहरातील गॅस एजन्सींमधील गोंधळ ऑनलाइन बुकिंगनंतरही कायम आहे. घरपोच गॅस सिलिंडरसाठी ऑनलाइन बुकिंग करूनही ग्राहकांना दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना सकाळी 7 वाजेपासून एजन्सीच्या गोदामासमोर रांग लावावी लागते. शहरातील ग्राहकांना बर्‍याच अंतरावरून सिलिंडरसाठी यावे लागते. याकडे संबंधित कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इण्डेन या तीन कंपन्या शहरातील ग्राहकांना गॅस सिलिंडर पुरवठा करतात. तिन्ही कंपन्यांचे सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. सर्वच गॅस एजन्सींनी आता ऑनलाइन बुकिंग सुरू केले आहे. परंतु, बुकिंग करूनही ग्राहकांना दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागते. शहरातील गॅस एजन्सीत ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना मोबाइलवर घरपोच सिलिंडर दिल्याचा ‘एसएमएस’ येतो. प्रत्यक्षात सिलिंडर मात्र मिळत नाही. एजन्सीत संपर्क साधल्यास तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. सिलिंडर पाहिजे असेल, तर गोदामाबाहेर असलेल्या गाडीतून घेऊन जाण्याची सूचना ते देतात. त्यासाठी ग्राहकांना भल्या सकाळी येऊन गोदामासमोर रांग लावावी लागते. नंबर आल्यानंतर एजन्सीच्या कार्यालयात जाऊन पावती घ्यावी लागते. त्यानंतर गोदामाबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून सिलिंडर मिळते. ग्राहकांना एजन्सीमधील गोंधळाचा नाहक फटका बसत आहे. गॅस वितरण सुरळीत करा, अशा सूचना एजन्सीला दिल्या आहेत, असे संबंधित कंपन्यांचे विक्री अधिकारी व प्रशासनाचे म्हणणे आहे. घरपोच गॅस सिलिंडरसाठी 1315 रुपये आकारले जातात. होम डिलिव्हरीसाठी 15 रुपये अतिरिक्त घेतले जातात. मात्र, एजन्सीचे कर्मचारी सिलिंडर घरी पोहोचवत नाही, असा आरोप ग्राहकांचा आहे.

कंपनीला माहिती देण्यात आली

ऑनलाइन बुकिंगनंतरही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना सूचना दिल्या, तसेच पत्रव्यवहार केला आहे. संबंधिताना याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ’’ अरुण शिंदे, जिल्हाधिकारी

ऑनलाइनचा घोळ एजन्सीचा

ऑनलाइन बुकिंगनंतर सिलिंडर मिळत नाही हा कंपनीचा नव्हे, तर संबंधित गॅस एजन्सीचा दोष आहे. याबाबत त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून सूचना देण्यात येतात. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास एजन्सींवर कारवाई केली जाईल.’’ मिर्शीकोटकर, विक्री प्रतिनिधी