आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ekanath Khadase Devendra Fadanvis Together Seen In Akola

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसे-फडणवीस नाराजी नाट्याचा अकोल्यात ‘सुखांत’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भाजपच्या सरकारमधील दोन दिग्गज नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून रंगत आलेल्या नाराजी नाट्याचा अखेर गुरुवारी अकोल्यात ‘सुखांत’ झाला. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपीठावर आलेल्या या दोन्ही मंत्र्यांनी आपापली नाराजी काही काळ का होईना दूर ठेवत सुसंवाद साधला. सुमारे तीन तास हे दोघेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र होते, हे विशेष.

मुख्यमंत्रिपदावरून डावलण्यात आल्याने खडसे सत्ता स्थापनेपासूनच नाराज आहेत. वरिष्ठ मंत्री असूनही आपल्या खात्यांत मर्जीप्रमाणे अधिकार्‍यांची नियुक्ती मिळत नसल्याने त्यांच्या नाराजीत भर पडली आहे. त्यामुळेच मंगळवारी आजारपणाचे कारण सांगत खडसेंनी मंत्रिमंडळ बैठकीस दांडी मारल्याची चर्चा होती. त्याच्या दुसर्‍याच दिवशी बुधवारी मुंबईत आणखी एका कार्यक्रमात एकत्र असूनही खडसे व फडणवीस या दोघांमध्ये संवाद होणे तर दूरच, दोघांनी एकमेकांकडे साधा कटाक्षही टाकला नव्हता. माध्यमांच्या नजरेतून हा ‘दुरावा’ सुटला नाही.

गुरुवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभास दोघेही विशेष निमंत्रित होते. या कार्यक्रमासाठी दोघेही एकाच विमानाने मुंबईहून अकोल्यात आले. कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही दोन्ही मंत्र्यांनी केले. त्यानंतर दीक्षांत समारंभातही एकमेकांच्या बाजूलाच हे दोघे बसले होते, त्यांच्यात हसतमुख संवादही झाले. तत्पूर्वी कुलगुरूंनी दोघांनी एकाच वेळी दीक्षांत कार्यक्रमाचा पोशाख परिधान करण्यासाठी नेले होते.