आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Counting Issue At Barshitakali Akola ZP Election

मतमोजणी प्रकियेत घोळ झाल्याचा आरोप; पोलिस अधीक्षकांची धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शिटाकळी - महिला उमेदवारांच्या पतींनी मतमोजणी प्रकियेत घोळ झाल्याचा आरोप केल्याने जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी व राजंदा गटाची फेरमतमोजणीची प्रक्रिया सोमवारी रात्री 11 वाजतादरम्यान करण्यात आली. या प्रकारामुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले होते. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी स्वत: धाव घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान या संदर्भात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बार्शिटाकळी गटातून काँग्रेसच्या रेहानाबी ज. आलमगीर खान विजयी झाल्या होत्या, तर राजंदा गटातून भारिप-बमसंच्या देवकाबाई दिनकर पातोंड विजयी झाल्या. मात्र, या निवडणूक निकालावर आक्षेप नोंदवत मतदान मोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या राजंदा गटातील उमेदवार जयर्शी वाटमारे यांचे पती रमेश वाटमारे यांनी केला. तर बार्शिटाकळी गटातून भारिप-बमसंच्या समीना अंजुम यांचे पती बिस्मिल्ला खान यांनी तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे या गटांच्या फेरमतमोजणीची प्रक्रिया रात्री 11 वाजता करण्यात आली.
या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांसह आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मतमोजणीच्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे झालेला तणाव निवळला. जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पुन्हा फेरतपासणी झाली. मात्र, निकालात कोणत्याही प्रकारचा बदल आढळून आला नाही. त्यामुळे निकाल ‘जैसे थे’ठेवण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

बार्शिटाकळी येथे तणाव
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केल्यानंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. या ठिकाणी मेहकर येथील उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे बंदोबस्ताची जबाबदारी होती. तणाव वाढून परिस्थिती अनियंत्रित होऊ नये, यासाठी अकोला येथून पोलिसांनी कुमक मागवली. तेथे अकोला येथील आरसीबीच्या 35 कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आले होते.
बार्शिटाकळी, राजंदा गटाची झाली फेरमतमोजणी