आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीवर डोळा ठेवून नेत्यांची दहीहंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन यंदा राजकीय नेत्यांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. खामगाव शहरात जागोजागी, चौकाचौकात राजकीय नेत्यांचे डिजीटल बोर्ड पाहावयास मिळाले. दहीहंडी उत्सवाला त्या-त्या मंडळांनी राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
समाजात एकता, समता, संघटन राहावे हा भगवान श्रीकृष्णांनी जनतेला संदेश दिला आहे. या शिकवणीचा एक भाग म्हणून परंपरागत पध्दतीने दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदाही शहरातील विविध मंडळी कडून दहीहंडी उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहरातील काही मंडळातर्फे हा उत्सव साजरा करताना आप आपल्या नेत्यांचे डिजीटल बोर्ड लावून एक प्रकारे या उत्सवाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला.
खामगाव शहरातील घाटपुरी नाका येथील श्री सदगुरु दत्त मंडळ व भगतसिंग चौकातील त्रिशूल मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी भाजपचे आमदार पांडुरंग फुंडकर व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश फुंडकर यांचे डिजीटल बोर्ड तर सनी टॉकीज जवळील आदर्श नवयुवक दल, चंदनशेष चौकातील चंदनशेष व्यायाम क्रीडा प्रसारक मंडळ व बालाजी प्लॉट भागातील अमरलक्ष्मी मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे डिजीटल बोर्ड बघावयास मिळाले. हे बोर्ड पाहून अनेकांनी आश्चर्यच व्यक्त केले.
आगामी काळातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता या नेत्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपले बोर्ड लावण्याचे सांगून एक प्रकारे हे मंडळ व मंडळाचे पदाधिकारी हे माझे समर्थक असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
आता लक्ष गणेशोत्सवाकडे
आता आठवडाभरानंतर गणेश उत्सव येत आहे. याचाही फायदा राजकीय नेते मंडळी घेणार आहे. गर्दीचे ठिकाण, लोकोत्सव, याचे औचित्य साधून संधीचा फायदा घेणे, हे राजकीय मंडळींना सांगण्याची आवश्यकता नाही. मुंबईतील दहीहंडी उत्सवातही राजकीय पक्षांचे नेते विविध चॅनलच्या माध्यमातून लोकांना आपले चेहरे दाखवण्याचा प्रयत्न करतात. सोबतच सिने अभिनेत्यांकडून आपले कौतुक करवून घेतात. हे लोण आता खामगावसारख्या शहरापर्यंत
पोहचत आहे.