आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उणे-दुणे'च आता बनणार प्रचाराचे मुद्दे: विकासाऐवजी नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्याच फैरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - युतीतुटल्याने आणि आघाडी फुटल्याने विधानसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा साइड ट्रॅक झाला आहे. मतदारांमध्येही आता विकासकामांऐवजी तुटी-फुटीबद्दलच चर्चा सुरू आहे. मतदारांच्या या मानसिकतेचा फायदा सर्वच पक्ष घेतील. त्यामुळे आता प्रचार सभांमधून एकमेकांचे उणी-दुणी आणि उट्टे काढण्यावरच भर दिला जाणार आहे. परिणामी, विकासासाठी मतदारांना परत पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

प्रारंभी निवडणुकीच्या मुद्याला जास्त महत्त्व नव्हते. १९८० पासून जातीय समीकरणांमुळे पुन्हा विकासाचा मुद्दा बाजूला पडला. तो आतापर्यंत तसाच आहे. प्रत्येक निवडणुकीत रस्ते, नाल्या, पाणी, वीज हेच प्रचाराचे मूलभूत मुद्दे होते. आता युवा मतदारांची संख्या वाढली मात्र, तुट-फुटीमुळे विकासाचा मुद्दा बाजूला पडला. अकोला शहर विकासापासून वंचित आहे. उड्डाणपूल, भूमिगत गटार योजना, रेल्वेवरील उड्डाणपूल या समस्या कायम आहेत. खारपाणपट्ट्यातील पाणी समस्या अद्यापही कायम आहे. ५२ वर्षांत जिल्ह्यात मोठा उद्योग आलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत किमान हे मुद्दे गाजतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. १५ वर्षे सत्ता गाजवलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आता निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध मते मागणार.

विकास का झाला नाही, यास आमचा पक्ष नाही तर आतापर्यंत मित्रपक्ष राहिलेला पक्षच जबाबदार आहे, असा टेंभा मिरवतानाच, जिल्ह्याच्या विकासाच्या फाइल आमचाच मित्र राहिलेल्या पक्षाच्या मंत्र्यांनी अडवल्या, अशी शेखीही मारणार. आता आमच्या पक्षाला सत्ता द्या, पाहा कसा जिल्ह्याचा विकास करतो, असे सांगत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडून मतदारांचे मनोरंजन करून त्यांना भुरळ घालण्याचाच प्रयत्न करतील. एकीकडे १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या आघाडीचे हे चित्र पाहावयास मिळेल, तर दुसरीकडे युतीतील मित्रपक्षही एकमेकांविरुद्ध विश्वासघात केल्याचा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडतील. युती तुटण्यास आम्ही नाही, आमचा मित्र राहिलेला पक्ष जबाबदार आहे, हे सर्व सांगताना मतदारांचे मनोरंजन कसे होईल, याची मात्र काळजी घेतली जाणार आहे. आघाडी सरकारमुळे विकास झाला नाही, हे सांगताना स्वत: विरोधी पक्ष म्हणून आपण जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरलो, या मुद्द्याला पूर्णपणे बगल देण्याचा प्रयत्न युतीतील दोन्ही घटक पक्ष जाहीर सभांमधून करताना दिसतील.