आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Propoganda News In Marathi, Made In China, Lok Sabha Election

निवडणुकीचे प्रचार साहित्य मेड इन चायना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. सद्य:स्थितीत देशातील लोकशाहीत सर्वोच्च प्राधान्य असलेल्या लोकसभेची निवडणूक होत आहे. मात्र, त्यासाठीच्या प्रचार साहित्यावर चीनने आपले वर्चस्व स्थापित केले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा प्रचार मेड इन चायना आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे प्रचार साहित्य 30 ते 35 टक्के स्वस्त मिळत असल्यामुळे त्याला या काळात मोठी मागणी आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वी मुंबईतील बाजारपेठेत लोकसभा निवडणुकीत गुजरातचे भाजपचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची छायाचित्रे असलेली मोबाइल कव्हरची विक्री केव्हाच सुरू झाली आहे.

गत काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचार साहित्य विक्रीची उलाढाल 15 ते 20 लाखांच्या घरात असल्याचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून दिसून आले. लोकसभा निवडणुकीत ही उलाढाल कमी राहण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल व राहुल गांधींच्या मुखवट्यांची क्रेझ राहणार आहे, असे मागणीवरून दिसत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गांधीरोडवरील राजू अग्रवाल वय 48 गत 20 वर्षांपासून निवडणूक प्रचार साहित्याची विक्री करतात. त्याकरिता सर्वच प्रमुख व स्थानिक पक्ष, नेते व कार्यकर्ते त्यांच्याशी संपर्क साधतात. ते म्हणाले की, हा हंगामी स्वरूपाचा व्यवसाय आहे, या व्यवसायालाही बदलत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
मोदी केजरीवाल गांधी आयकॉन : नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल राहुल गांधी यांच्या प्रतिमा असलेल्या प्रत्येक प्रचार साहित्याची मागणी आहे. त्यातही नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. कार्यकर्त्यांना टोपी. टी शर्टवर नरंद्र मोदी हवेत त्या सोबतच महिला कार्यकत्यांना तर कर्णफुलातही नरेंद्र मोदींचा फोटो हवा.


कार्यकर्त्यांना निवडणूक चिन्ह कमळ, पंजाची अंगठी हवी असते, तर महिलांना घड्याळ, पंजा, कमळाच्या चिन्हांची किनार असलेली साडी हवी असते. पेन, मोबाइल कव्हर, दुपट्टा, बिल्ले, झेंडे व टोप्यांवर निवडणूक चिन्ह व प्रमुख नेत्यांच्या फोटोकडे कार्यकर्ते चटकन आकर्षित होतात. भाजप, काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, बसप, समाजवादी पक्ष, यूडीएफ आदी पक्षांच्या साहित्याची मागणी असते. राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेस सोबत युती असल्याने त्यांच्या पक्षाच्या साहित्याची लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मागणी थोडी कमी असते. मध्यंतरी निवडणुकीत हिर्‍यांसारख्या चमकणार्‍या बिल्ल्यांना खूप मागणी होती. नेत्यांच्या प्लास्टिकच्या पुतळ्यांना जास्त मागणी नाही. या काळात काळ्या झेंड्यांची मागणी नसल्याचे विक्रेत्याने सांगितले.


चिनी आक्रमण : निवडणूक प्रचार साहित्यातील चीननिर्मिती साहित्य टिकाऊ नसले, तरी स्वस्त आहे. जिथे हे साहित्य निर्माते गणपती, श्री लक्ष्मीच्या मूर्ती तयार करून ग्राहकांना आकृष्ट करत आहेत. तिथे प्रचार साहित्यातील वेगळेपण जाणवत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गांधी टोपी 90 रुपये डझन मिळते. परंतु, चायना टोपी फक्त 36 रुपये डझन असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रचार साहित्याचे दर
* टोपी- चार रुपयांना
* दुपट्टा- तीन ते 12 रुपये
* बिल्ला- 30 पैसे ते 30 रुपयांपर्यंत
* मुखवटा- कागदी : दोन रुपये 50 पैसे, प्लास्टिक : 9 रुपये, रबरी : 22 रुपये
* डोक्याच्या पट्टय़ा - दीड रुपया
* झेंडे- दोन रुपये 15 पैसे (छोटे) मोठे- दोन बाय तीन फूट : 32 रुपये
* साडी-180 रुपये
* टी- शर्ट- 40 रु. 65 रु.


बदलती परिस्थिती : श्री. अग्रवाल म्हणाले की, ग्रामपंचायत, मनपा, जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये प्रचार साहित्याची विक्री जास्त होते. परंतु, लोकसभा निवडणुकीत एक पक्ष-एक उमेदवार अशी स्थिती असते. खासदार आमदारांच्या दौर्‍यांदरम्यान प्रचार साहित्य विक्रेते त्यांना भेटतात. या संपर्कामुळे हे काम दिल्ली, मुंबईतील विक्रेत्यांना मिळण्याची शक्यता असते, शिवाय ते विक्रेते घरपोच साहित्य पोहोचवण्याचे आश्वासन देतात, असे त्यांनी सांगितले.