आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात तांत्रिक बिघाडामुळे आले विघ्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गणेशोत्सवाला भारनियमनापासून मुक्ती मिळाली असली तरी, तांत्रिक बिघाडामुळे उत्सवात विघ्न निर्माण झाले आहे. शहरातील विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाला असून, सणासुदीच्या काळात नागरिक त्रस्त झाले आहेत.

भारनियमन बंद करण्याची घोषणा करण्यात आल्याने दहा दिवस का होईना नागरिकांना भारनियमनापासून सुटका मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भर गणेशोत्सवात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावेच लागत आहे. गणेश चतुर्थीपासून भारनियमन बंद करण्याची वल्गना महावितरणने केली आहे. शहरातील बहुतांश फिडर्स या पूर्वीच भारनियमनमुक्त आहेत. काही फिडर्सवर भारनियमन सुरू होते. गणेशोत्सवानिमित्त त्या फिडर्सवरचे भारनियमनही सोमवारपासून बंद करण्यात आले. मात्र, दुसर्‍याच दिवशी मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला. औद्योगिक वसाहतीतील महापारेषणच्या 132 वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाडासह चार उपकेंद्रातील वीजपुरवठा प्रभावित झाल्यामुळे शहरातील उमरी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, राधाकिसन प्लॉट, गोरक्षणरोड, रतनलाल प्लॉट, शास्त्रीनगर, सुधीर कॉलनी, जवाहरनगर, जठारपेठ, सिव्हिल लाइन, तापडियानगर, न्यू तापडियानगर आदी भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

डाबकी उपकेंद्र निरुपयोगी
शहराच्या चार उपकेंद्रांतील विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर पर्याय म्हणून वापर करण्यासाठी डाबकी उपकेंद्र निर्माण करण्यात आले आहे. मंगळवारी या उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तो प्रयत्न फसल्याने डाबकी वीज उपकेंद्र निरुपयोगी आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण
गणेशोत्सव उत्साह व आनंदाचा सण आहे. मात्र, याच काळात होणार्‍या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी गणेश मंडळांनी जोशात तयारी केली. विविध देखावे, रोषणाई केली. मात्र, ऐन गणेशोत्सवातच विद्युत पुरवठा प्रभावित होत असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. गणेश मंडळांनी केलेली सजावट विजेअभावी कुचकामी ठरत आहे.

पाच तास विद्युत पुरवठा खंडित
महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे अध्र्या शहरातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. काही भागातील विद्युत पुरवठा तर तब्बल पाच तासांपर्यंत विस्कळीत होता. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झालेत.

युद्धस्तरावर कार्य
गणेशोत्सवात शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणचे युद्धस्तरावर कार्य सुरू आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तो आता पूर्ववत करण्यात आला आहे. गणेशोत्सवात विद्युत पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कटाक्षाने काळजी घेण्यात येत आहे.
-धर्मेश मानकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, अकोला.