आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electronic For Protecting House, Latest News In Divya Marathi

घराच्या सुरक्षेसाठी आता इलेक्टॉनिक वस्तूंचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-वाढत्या गुन्हय़ांचा चढता आलेख असलेल्या महानगरातील अकोलेकर स्वत:च्या व घराच्या सुरक्षिततेविषयी बरेच जागरूक झाल्याचे सुरक्षाविषयक उपकरणांच्या विक्रीतून दिसून येत आहेत. महानगरात इलेक्टॉनिक सुरक्षा उपकरणांची विक्री करणारी जवळपास 25 दुकाने आहेत. येथे दुकानाच्या, घराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीपासून ते व्हिडिओ डोअर फोनपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे.
घराच्या सुरक्षेवर नजर
तुम्ही जगात कुठेही असा परंतु दुकान व घरात लावलेल्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण तुमच्या मोबाइलवर बघणे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. सीसीटीव्ही डीव्हीआर व नेट कनेक्ट केल्यास मोबाइलवरसुद्धा आपले घर सुरक्षित आहे किंवा नाही, हे पाहू शकता, अशी माहिती या उपकरणांची विक्री करणारे मनोज मेंढे यांनी दिली. जादूई उपकरणे : बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेर्‍याव्यतिरिक्त जीएसएम अलार्म सिस्टिम उपलब्ध आहे. डोअर सेंसर, मॅग्नेटिक कॉन्टॅक्ट डोअर, शटर लॉक सेंसर यांनाही अलार्म सिस्टिम जोडलेली असते. चोरट्याने किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीने दरवाजाला हात लावला तर सेंसर अँक्टिव्हेट होऊन जीएसएम डायलद्वारे तुमच्या मोबाइलवर व्हॉइस कॉल येईल किंवा एसएमएस येईल. विशेष म्हणजे एकाचवेळी 15 सहकार्‍यांना ही सूचना मिळण्याची व्यवस्था आहे.
व्हिडिओ डोअर फोन : तुमच्या घरासमोर येऊन एखाद्या व्यक्तीने बेल वाजवली तर व्हिडिओ डोअर फोनद्वारे त्या व्यक्तीचा चेहरा दिसतो. एवढेच नव्हे तर दार न उघडताही त्या व्यक्तीसोबत संवाद साधता येतो. समोरील व्यक्ती ओळखीची असेल तर रिमोटद्वारे दरवाजा उघडता येतो.
इतर उपकरणे :
बाजारपेठेत जीपीएस कार्ड उपलब्ध आहे. भाड्याच्या चारचाकीत किंवा वाहन चोरीला गेल्यास ते वाहन जीपीएसद्वारे ट्रेस करता येते. गुगल मॅपवर त्या वाहनाचे लोकेशन समजते.
उपकरणांच्या किमती कमी होण्याची प्रतीक्षा :
सीसीटीव्ही युनिट 25 हजार, जीएसएम अलार्म सिस्टिम 35 ते 40 हजार, व्हिडिओ डोअर फोन 16 ते 20 हजार, लॉकर्स 9 हजार, नोटा मोजण्याचे यंत्र 5 हजार, थंब यंत्र 16 हजार रुपये किमतीत उपलब्ध आहे. या उपकरणांवर एक वर्षांपर्यंत सेवा मोफत आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. ही उपकरणे मागणीनुसार अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, फरीदाबाद, दिल्ली आदी ठिकाणांहून बोलावून दिली जातात.