आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employees Of Akola Municipal Corporation 's Salary Issue, Divya Marathi

अकोला महापालिकेच्‍या कर्मचा-यांचे पाच महिन्यांपासून वेतन नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका कर्मचार्‍यांचे पाच महिन्यांच्या वेतनासह 70 कोटी रुपयांची विविध देणी थकली आहे. सेवानिवृत्तीनंतरही ही देणी मिळाली नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये प्रशासनाप्रति नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिकेत एकूण 2100 कर्मचारी कायम आस्थापनेवर आहेत, तर 315 शिक्षकही कार्यरत आहेत. महापालिकेचे उत्पन्न कमी असल्याने आस्थापना खर्च जवळपास 48 ते 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचार्‍यांना नियमित वेतनही मिळत नाही तसेच भविष्य निर्वाह निधीसह विविध देणीही प्रशासनाला कर्मचार्‍यांना देता येत नाही. प्रशासनाकडे पाच महिन्यांचे थकित वेतन 25 कोटी, भविष्य निर्वाह निधीचे एक कोटी 40 लाख, पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम सात कोटी, उपदान राशी 40 लाख, अंशराशीकरण एक कोटी 10 लाख, कालबद्ध पदोन्नती 20 लाख, अजिर्त रजा रोखीकरण एक कोटी 70 लाख, पेन्शन विक्री एक कोटी तसेच शिक्षकांचे विविध देणी 21 कोटी असे एकूण 70 कोटी रुपये कर्मचार्‍यांचे थकित आहेत. प्रशासन कार्यरत असताना हक्कांच्या पैशापैकी कोणताही पैसा देत नाही, परंतु कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर किमान त्याला त्याच्या हक्काचे सर्व पैसे एकाच वेळी मिळावेत, अशी कर्मचार्‍यांची इच्छा आहे.

परंतु, सेवानिवृत्तीनंतरही हक्काचे पैसे मिळण्यास तीन ते पाच वर्ष लागत असल्याने कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने महापालिका कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बिडवे यांना विचारले असता ते म्हणाले, कर्मचार्‍यांच्या हक्काचे पैसे प्रशासनाकडे थकित आहेत. थकित रकमेसाठी संघटनेने वारंवार आंदोलनही केले आहे. प्रशासनाकडे पैसा नसल्याने एकाच वेळी सर्व कर्मचार्‍यांना थकित रक्कम देणे शक्य होत नाही, परंतु तरीही प्रशासनाने टप्प्याटप्प्याने कर्मचार्‍यांना त्यांचे हक्काचे पैसे द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.