आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला शहरातील अतिक्रमणाचा केला सफाया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘क्लीन अकोला-ग्रीन अकोला’ या मिशनअंतर्गत सिंधी कॅम्प आणि खदान परिसरात 4 जुलैला राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत सात दुकानांचा सफाया झाला. खदानीच्या काठालगत सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, दगडफेक करणा-यांवर राइट कंट्रोल पोलिसांच्या जवानांनी लाठीचार्ज केला.

3 जुलैची अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत पार पडली. 4 जुलैला संवेदनशील समजल्या जाणा-या खदान भागात ही मोहीम राबवण्यात आल्याने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर जातीने उपस्थित राहिले, तर तगडा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला. जेलचौकापासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. महापालिकेच्या अधिकारी निवासस्थानालगत असलेली चार दुकाने अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. याचसोबत गणेश प्रोव्हिजन, शामुमल हलवाई, ओम इलेक्ट्रिकल्स, लक्ष्मी वॉच, गुरुदेव स्टील सेंटर, विद्या रतन कॉम्प्लेक्स, आशा मूव्हिज, सपना गिफ्ट सेंटर, किरण वाइन शॉप आदींसह विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांचे ओटे, पाय-या, टिनशेड पाडण्यात आले. खदानीचा फायदा घेऊन कुट्टी व्यवसायासह, हॉटेल, सायकल दुरुस्ती दुकानांचाही सफाया अतिक्रमण हटाव पथकाने केला.

जमावावर लाठीचार्ज : जमावाला मोहिमेपासून दूर करताना पोलिस दलावर दगडफेक करणा-या युवकांवर राइट कंट्रोल पोलिस दलाच्या जवानांनी लाठीचार्ज केला. या दलाला तीन ते चार वेळा लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर बघे पांगले.

क्षेत्रीय अधिका-यांनी काढली वाहने: व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या टिनशेडचे अतिक्रमण काढताना टिनशेडखाली ठेवलेली वाहने अडथळा ठरत होती. गर्दीमुळे महापालिकेच्या कर्मचा-यांना आवाज देणेही अशक्य झाले. त्यामुळे मोहिमेत खोळंबा निर्माण होत होता, ही बाब लक्षात घेऊन क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांनी स्वत: टिनशेड खाली ठेवलेली वाहने बाहेर काढली.

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
ख्रिश्चन कॉलनी परिसरात आग लागल्याने मोठ्या प्रमाणात काळा धूर निघू लागला. त्यामुळे कुठे तरी आग लागली, या अफवेने मोहीमही काही मिनिटे थंडावली. परंतु, प्रत्यक्षात ख्रिश्चन कॉलनीलगत असलेल्या खदानीतील कचरा जाळून मोहिमेचे लक्ष विचलित करण्याचा काही जणांनी हा प्रयत्न केला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

मुख्य जलवाहिनीवर थेट जोडणी
खदानीलगतचे अतिक्रमण काढल्यानंतर अनेक ठिकाणी थेट मुख्य जलवाहिनीवरून अवैधरीत्या अनेक नळजोडण्या घेतल्याची बाब निदर्शनास आली. या अवैध नळजोडण्या तोटून जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे आदेश उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिले.

माझे पाडले त्याचेही पाडा
शुक्रवारच्या मोहिमेत आपसी दुश्मनीचा फायदा प्रशासनाला मिळाला. पथकाला अतिक्रमणाबाबत नागरिकांनीच माहिती दिली. राजकुमार मूलचंदानी यांच्या अतिक्रमणाची माहिती एका व्यावसायिकाने दिली. या माहितीवरूनच राजकुमार मूलचदांनी यांचे अतिक्रमण पाडण्यात आले. ज्या व्यक्तीमुळे अतिक्रमण काढले गेले, त्या व्यक्तीचेही अतिक्रमण असल्याची माहिती राजकुमार मूलचदांनी यांच्या नातेवाइकांनी पथकाला दिली. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाचेही अतिक्रमण काढण्यात आले.

नगरसेवकाचेही अतिक्रमण काढले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजकुमार मूलचंदानी यांचे दीड फुटाचे लोखंडी अतिक्रमण पथकाने उखडून टाकले. हे अतिक्रमण नाही, नियमानुसार आहे, असे सांगून त्यांनी ही कारवाई रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, हे अतिक्रमण पाडले.

विद्युत पुरवठा कसा?
खदानीलगत अनेक घरे, दुकाने जागा लीजवर न घेता तसेच महापालिकेकडून बांधकामाची परवानगी न घेता, बांधण्यात आली होती. हे सर्व अतिक्रमण महापालिकेने जमीनदोस्त केले. या नागरिकांजवळ कोणतीही कागदपत्रे नसताना त्यांना विद्युत खांबावरून विद्युत मीटरसह वीजपुरवठा महावितरणने कसा दिला? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.