आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस बंदोबस्तात झेंडे, बॅनर्सवर चालला गजराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर मंगळवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वेळी तगड्या पोलिस बंदोबस्तात शहरातील प्रमुख मार्गांवरील झेंडे आणि जाहिरातींचे फलक काढण्यात आले. अकोलेकरांनी पोलिसांना सहकार्य करत मार्गावर लावलेले झेंडे आणि जाहिरातींचे फलक स्वयंस्फूर्तीने काढले.

शहरात लावण्यात आलेले अवैध झेंडे आणि फलकांनी शहराच्या साैंदर्यीकरणास बाधा निर्माण होत असल्यामुळे कायद्याचा आधार घेत शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी एक मोहीम हाती घेतली. तगड्या पोलिस बंदोबस्तात डॉ. प्रवीण मुंढे सकाळी ११ वाजता रस्त्यावर उतरले. त्यांच्यासोबत महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथकही होते. पुढे गजराज, सोबत महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी आणि डॉ. प्रवीण मुंढे असा ताफा सिटी कोतवालीपासून निघाला. या वेळी त्यांनी सुरुवातीला कोतवाली ते टिळक रोड, सुभाष रोड, दीपक चौक, दामले चौक, रेल्वेस्थानकापर्यंतच्या मार्गावर लावण्यात आलेले सर्व झेंडे, जाहिरातींचे फलक आणि दुकानांवर दुकानच्या नावाव्यतिरिक्त लावलेले कंपन्यांचे अवैध होर्डिंग्ज या वेळी काढले.

जवानांचीतुकडी : सिटीकोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, रामदासपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी, आरसीपीचे जवान आणि मुख्यालयातील राखीव जवानांची तुकडी तगडा बंदोबस्त ठेवून होती. पोलिसांचा ताफा पाहून आता काही खैर नाही, म्हणून कुणीही अतिक्रमण मोहिमेत आडवे येण्याचा प्रयत्न केला नाही.

सिटी कोतवाली रोड, टिळक रोड, उदय टॉकीजसमोरील रस्ता, अकाेट स्टँड, सुभाष रोड, दीपक चौक, दामले चौक ते रेल्वेस्थानकापर्यंत अतिक्रमण काढण्यात आले.

यापुढे गुन्हे दाखल करणार
-फ्लेक्स,स्वागत कमानी, झेंडे पताकांसाठी महापालिका परवानगी देत असली तरीही परवानगी देण्यापूर्वी महापालिकेला पोलिसांची एनओसी घेणे आवश्यक राहील, त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी महापालिकेला तसे पत्रही दिले आहे. स्वागत कमानी कोणत्याही नियमात बसत नाही, त्याची परवानगी देता येत नाही. त्यामुळे यापुढे कोणी रस्त्यावर स्वागत कमानी लावल्या तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. डॉ.प्रवीण मुंढे, शहरपोलिस अधीक्षक

अधिकाऱ्यांना मिळाले पाठबळ
महापालिकेच्याधडक कारवाईला पोलिस बंदोबस्तासाठी परवानगी घ्यावी लागत होती. मात्र, आता पोलिस विभागानेच पुढाकार घेतल्यामुळे महापालिकेच्या हातात हात घेऊन अतिक्रमणाचा सफाया होणार असल्यामुळे , यापुढे शहराचे सौंदर्यीकरण राहण्यात मदत होईल. तसेच पोस्टर्स बॅनर्स लावण्यात येत असल्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटनांनासुद्धा आता आळा बसणार आहे. या कारवाईचे अकोलेकरांनी स्वागत केले आहे.