आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांमुळे थांबला जेसीबीचा पंजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपा प्रशासनाने 26 जून रोजी अतिक्रमण हटाव मोहीम धडाक्यात सुरू केली. वादग्रस्त व चर्चेचा विषय ठरलेल्या गजानन मार्केटमधील चारही पक्की अनधिकृत दुकाने अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. मात्र, पंजाब काश्मीर लॉजजवळील वादग्रस्त पान सेंटरवर आदळणारा जेसीबी मशीनचा पंजा पोलिसांच्या असहकार्यामुळे हवेतच थांबला.
आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 26 जूनपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार असल्याची माहिती दिली होती. या अनुषंगाने गुरुवारी पहाटे साडेपाचपासून सकाळी दहापर्यंत आयुक्त डॉ. कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, नगररचना विभागाचे संदीप गावंडे, विष्णू डोंगरे, जी.एम.पांडे यांनी ही मोहीम आरडीजी महाविद्यालय, शासकीय दूध डेअरी या परिसरात राबवली. त्यानंतर दुपारी 11.30 वाजता गांधी चौक, सुभाष मार्ग, ताजनापेठ पोलिस चौकी चौक, महंमद अली रोड, फतेह चौक, काश्मीर लॉज या मार्गावर मोहीम राबवण्यात आली.

गजानन मार्केटमधील दुकाने जमीनदोस्त : गजानन मार्केटमधील शासकीय जागेत महंमद जावेद तेली यांनी अनधिकृतपणे बांधलेली चारही पक्की दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. या बांधकामात राजकीय पदाधिकार्‍यांनी पैसा लावला होता. त्यामुळे दुकाने अनधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब झाल्यानंतरही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर महापौर ज्योत्स्ना गवई, गटनेते गजानन गवई, नगरसेवक गोपी ठाकरे, पंकज गावंडे, नम्रता मोहोड, प्रशांत भारसाकळे यांनी या चार दुकानाच्या अतिक्रमणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार नोटीस बजावली होती. यानंतरही जावेद तेली न्यायालयात गेले होते. न्यायालयात जावेद तेली यांच्याविरुद्ध निकाल लागला. जानेवारी 2014 मध्ये अतिक्रमण हटाव पथकही दुकाने पाडण्यासाठी गेले असता, दगडफेकीचा प्रकार घडला होता.
पान सेंटरजवळ थंडावली कारवाई : धडाक्यात सुरू करण्यात आलेली ही मोहीम काश्मीर लॉजनजीकच्या एका पान सेंटरजवळ थंडावली. घटनास्थळी शहर कोतवालीचे ठाणेदार अनिरुद्ध अढाव, रामदासपेठचे विनोद ठाकरे, सिव्हिल लाइन्सचे प्रकाश सावकार, खदान पोलिस ठाण्याचे सी. टी. इंगळे उपस्थित होते तसेच आरसीपीच्या चार बटालियनही होत्या. परंतु पोलिस प्रशासनाने पान सेंटरवरील कारवाई टाळण्यासाठी पुढाकार घेतला आणि अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली.
दोघांवर करडी नजर : उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे तसेच सहायक आयुक्त चंद्रशेखर गुल्हाणे हे कारवाईला दांडी मारून जातात का, यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले होते, परंतु दोघेही कारवाई संपेपर्यंत थांबले.

मै दर्शक हूँ : उपायुक्तांना भेटून काहींनी कारवाई थांबवण्याची विनंती करत होते, त्या वेळी त्यांनी आयुक्तांना भेटा, असे सांगितले. तर आयुक्तांना काही जण कारवाईबाबत भेटायला गेले की ‘मै तो दर्शक हूँ, पावरवाले वो सामने अपना काम कर रहे है’, असे सांगून त्यांची बोळवण करत होते.
दो मिनट मे टुट जायेगा : एक व्यावसायिक साहेब, मुझे आधा घंटा दो, मै टिनशेड निकाल लेता, अशी विनंती करायला आयुक्तांकडे आला. मात्र, आयुक्तांनी त्याला ‘चिंता मत करो, आधा घंटा क्यो, दो मिनिटमे टिनशेड टुट जायेगा, खाली टिनशेड गिराने का खर्चा मनपा को देदो’, असे सांगितले.
आरसीपीचे चार पथक : कारवाईदरम्यान शहर कोतवाली, रामदासपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस तसेच राइट कंट्रोल पोलिसच्या चार तुकड्या तैनात होत्या. या पथकाच्या एका तुकडीत 25 पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवताना तगडा बंदोबस्त होता.
गांधी चौक ते महंमद अली चौक : या मार्गात प्रजापती सोडा फॅक्टरी, अतुल गारमेंट, सुरभी ज्वेलर्स, निर्मल स्वीट मार्ट, गुणवंती ज्वेलर्स, ललिता डेली नीड्स, फ्रेंड्स आॅप्टिकल, क्रॉकरी पॅलेस, जितेंद्र स्टोअर्स, चिराणिया किराणा स्टोअर्स, श्री झेरॉक्स, गुजराती स्वीट्स, आन फूट वेअर, गुलाबचंद सारडा, पारेख गारमेंट, भारत हार्डवेअर, जयंतीलाल द्वारकाद्वास, नवरंग पेंट्स, एस.एस.ब्रदर्स, इज्जी पेंट्स.
महंमद अली चौक ते फतेह चौक : या मार्गावर अब्दुल अली मामुजी, गौरी शंकर भांडी भंडार, अजमेरी स्टोअर्स, न्यू एजन्सी, वजीही हार्डवेअर, इंडियन हार्डवेअर, महंमद अली अँड कंपनी, शाहिद स्टील, बालाजी प्रोव्हिजन, पूनम प्लास्टिक, कादरभाई अब्दुल्ला अँड कंपनी, शुभम मार्केटिंग, गुरुनानक खेल खिलौने, महाराष्ट्र शू सेंटर.
पोलिसांनीच दिली संधी : पान सेंटरवर कारवाई करताना पोलिसांनीच संबंधिताला उपायुक्तांसमोर उद्या कागदपत्रे सादर कर अन्यथा पोलिसच पान सेंटर जमीनदोस्त करतील, अशी समज दिली. ही संधी देण्यात पुढाकार घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.


(फोटो - गांधी चौक ते महंमद अली चौक या मार्गातील व्यावसायिकांचे टिनशेड पाडण्यात आले. अतिक्रमण हटवतांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
छाया : नीरज भांगे)