आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...अन् होत्याचे नव्हते झाले; जुन्या बसस्थानकासमोरील सर्व दुकाने भुईसपाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘आपले अकोला, क्लीन अकोला’ मिशनअंतर्गत 27 जूनच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत जुन्या बसस्थानकासमोरील 60 वर्षांपासून असलेली 45 दुकाने काही वेळेतच होत्याची नव्हती झाली. महापालिकेची ही अतिक्रमण हटाव मोहीम ऐतिहासिक ठरली. आतापर्यंत आलेल्या सर्व आयुक्तांचे रेकॉर्ड आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आणि उपायुक्त दयानंद चिंचोलीकर या जोडीने तोडले आहेत. या मोहिमेमुळे सुंदराबाई खंडेलवाल टॉवरने खर्‍या अर्थाने मोकळा श्वास घेतला.
26 जूनपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी गांधी चौक, महंमद अली चौक, फतेह चौकापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली, तर 27 जूनला अशोक वाटिका ते मदनलाल धिंग्रा चौक ते टॉवर चौक, रेल्वेस्थानक चौक यादरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार होती. सकाळी 11 वाजता अशोक वाटिकेपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या नेतृत्वात प्रारंभ करण्यात आला. या वेळी पानटपर्‍या, चहाच्या टपर्‍यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य जागो पहिलवान यांचे हिमानी मराठा भोजनालय जमीनदोस्त करण्यात आले. बसस्थानकाला लागून असलेल्या विविध लघू व्यावसायिकांची दुकाने बुलडोझरने उद्ध्वस्त केले, तर ज्यांना संधी मिळाली, त्यांनी आपली दुकाने स्वत: हटवली. तोपर्यंत जुन्या बसस्थानकासमोर साधारणत: 1955 पासून उभी असलेली जवळपास 45 व्यावसायिकांना हा बुलडोझर इकडे वळेल, याबाबत माहिती नव्हती. परंतु, काही क्षणात दोन बुलडोझर 45 दुकानांवरून फिरले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.
पत्त्यासारखी कोसळलेली दुकाने
60 वर्षांपासून वसलेली या दुकानांपैकी बहुतेक दुकाने टिनाची होती, तर काही व्यावसायिकांनी चार इंचीच्या भिंती उभारल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेत झुणका भाकर केंद्र, कमल बुक डेपो, कमल एन्टरप्रायजेस, गावंडे बंधू, बहार हॉटेल, विनोद झेरॉक्स, मनप्रीत एसटीडी, साई आॅनलाइन, महेंद्र आॅटो पार्ट, सिंग बिल्डिंग मटेरियल, नेताजी रबर स्टॅम्प, यश जनरल स्टोअर्स, ललित स्टोअर्स, फ्लेक्स प्रिटिंग, विजयदीप मोबाइल, ए-वन हॉटेल, बालाजी फ्लेक्स, राजकुमार मोबाइल, माउली ग्राफिक्स, आर. के. भोजनालय, अशोक मोबाइल, मनीष रेस्टॉरंट, राजश्री लॉटरी, कृष्ण स्विट मार्ट, हेमा वाइन बार, जय गजानन टी सेंटर, बालाजी मोबाइल, लव्हली इलेक्ट्रिकल्स, हरिओम मोबाइल, राज फुटवेअर, राजपाल मोबाइल, जय भारती भोजनालय, गणेश हेअर कटिंग, आतीश आॅटो पार्ट, होलसेल अंडा विक्री, मधू हेअर कटिंग, राजा इलेक्ट्रॉनिक्स, मौलाना वॉच सेंटर, प्रवीण इलेक्ट्रॉनिक्स आदी दुकाने पत्त्यासारखी कोसळली.
मदतीच्या नावाखाली लूट
दुकाने तुटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर व्यावसायिकांची दुकानातील साहित्य बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू झाली. यामध्ये काही ठगही सामील झाले. मदत करण्याच्या नावाखाली अनेक भामट्यांनी किमती साहित्य लंपास केले.
युवकाचा आकांत
अशोक वाटिका परिसरात अनेकांनी चारचाकी गाड्या गल्लीबोळात नेल्या. परंतु, पथकाने गाड्या बुलडोझरने साहित्यासह चिरडून टाकल्या. एका युवकाने सामान काढू द्या, गाडी तोडू नका, असा आर्जव करत हा युवक चक्क जेसीबी मशीनच्या पंज्याला लटकला.
संधी न दिल्याने मोहीम यशस्वी
जुन्या बसस्थानकासमोरील काही व्यावसायिकांना 1999-2000 मध्ये लालबहादूर शास्त्री मैदानाचे बांधकामात बांधलेले गाळे देण्यात आले. त्यांना नझूल विभागाने लीज वाढवून दिली. परंतु, अनेक व्यावसायिकांजवळ 2003-2004 पासून त्याची कागदपत्रे उपलब्ध नव्हती. तसेच यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन नोटीस दिल्यास न्यायालयात धाव घेतल्यास कारवाई करता येणार नाही, ही खूणगाठ बांधून प्रशासनाने या व्यावसायिकांना नोटीस बजावल्या नाहीत आणि कोणतीही संधी दिली नाही. त्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली.
पोलिसांचे पुन्हा असहकार्य
मोहिमेत शहर कोतवाली पोलिस सहभागी झाले होते. रामदासपेठ पोलिसांनी थातूरमातूर सहभाग दर्शवला. रामदासपेठ पोलिसांची उपस्थिती नगण्य होती. परंतु, तोकडा पोलिस बंदोबस्त असतानाही महापालिकेने न भूतो न भविष्यती, अशी मोहीम राबवली.
ठक्कर यांचा खोडा
नवीन बसस्थानकाच्या मागे अतिक्रमण हटाव मोहीम राबवताना भाजपच्या नेत्या सोनल ठक्कर यांनी दुकानासमोरील टिनशेड काढताना मोहिमेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही.
(फोटो - अकोल्यात दुपारी टॉवर चौक ते फत्ते चौकापर्यंत शुक्रवारी अतिक्रमण काढण्यात आले. तेव्हा दुकानदारांनी आपले साहित्य काढण्यासाठी धावपळ सुरू केली होती. छाया : नीरज भांगे)