आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमणाचा सफाया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका अतिक्रमणविरोधी पथकाने आज रेल्वेस्थानक परिसरात बड्या व्यक्तींवर कारवाई करत कुठलाही भेदभाव नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सामान्य नागरिकांनी या मोहिमेस व्यापक पाठिंबा देत महापालिका प्रशासन, आयुक्त, उपायुक्त व इतरांचे कौतुक केले आहे. या मोहिमेमुळे शहरातील रस्ते मोकळे झाले असून, अनेकांनी आता स्वत:हून अतिक्रमण काढण्यास पुढाकार घेतला आहे.

मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज चौथा शनिवार हा सुटीचा दिवस असताना स्टेशनरोड परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला प्रारंभ केला. कारवाई शांततेत सुरू असताना येथील जसनागरा हॉटेलचे मालक जसपालसिंग नागरा यांनी कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मनपा अधिकार्‍यांनी कोणालाही न जुमानता कारवाई सुरू ठेवली. रेल्वे स्टेशन परिसरातील व्यावसायिकांनी हॉटेल, दुकानांसमोर बांधलेले पक्के ओटे तसेच उभारलेले पक्के टिनशेड अतिक्रमण विभागामार्फत तोडण्यात आले. रेल्वे स्टेशनवरील साफसफाईनंतर अतिक्रमण विभाग येथून अकोटफैलकडे जाणार्‍या मार्गाकडे वळला. या मार्गावरील गुरुद्वारा परिसरात असलेले लहान मोठे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. नंतर तापडियानगरातील भांबुरकर दवाखाना परिसर, दुर्गा चौक परिसर आणि जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत परिसरातील नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले.

फोटोची ढाल पण..
शिवसेना पदाधिकार्‍यांचा भाऊ असलेल्या पवन बगेरे यांच्या जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरील हॉटेलमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो होता. तो अतिक्रमणविरोधी पथकाने काढू नये, असा बगेरे समर्थकांचा होरा होता. पण, महापालिकेच्या पथकाने सन्मानपूर्वक व पूजा करून तो काढण्याची तयारी दाखवली. त्यामुळे अखेर त्या ठिकाणी शहरप्रमुख तरुण बगेरे यांनी समर्थकांना निर्देश देत स्वत: पुढाकार घेतला व येथील अतिक्रमण काढत महापालिकेला सहकार्य केले.

आयुक्त व उपायुक्तांचे मुंबईतून लक्ष
आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर व उपायुक्त दयानंद चिंचोलीकर हे दोघेही मुंबईला शासकीय कामानिमित्त गेले आहेत. तरीही त्यांचे येथील मोहिमेवर लक्ष होते. आजची मोहीम ही स्थानिक अधिकार्‍यांनी राबवली. कुठल्याही दबावाला बळी न पडता अधिकार्‍यांनी काम केले. यामध्ये डॉ. उत्कर्ष गुटे, राजेंद्र घनबहादूर, जी. एम. पांडे, कैलास पुंडे, अनिल बिडवे, संदीप गावंडे, विष्णू डोंगरे आदींचा समावेश होता. दरम्यान, उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे गेले कुठे, अशी चर्चा महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये होती.
आज कुणी आले नाही मदतीला : रेल्वे स्थानकाबाहेरील जसपालसिंग नागरा कोर्टयार्ड या दुकानावर कारवाई होत असताना त्यांच्या मदतीला कुठलाही नगरसेवक, लोकप्रतिनिधी धावून आला नाही. दुकानासमोरील लोखंडी बारचे अतिक्रमण काढण्यात आले. तत्पूर्वी जसपालसिंग नागरा, सिमरन नागरा यांनी अतिक्रमणविरोधी पथकाला स्वत: तोडून घेण्याची हमी दिली. पण, उपस्थित सहा. नगररचनाकार संदीप गावंडे यांनी त्यास नकार देत कारवाई केली.
कारवाईच्या खर्चाची वसुली व्हावी : महापालिका अतिक्रमण काढताना मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त, जेसीबी, कर्मचारी वर्ग यांना नियुक्त केले जाते. याचा मोठा खर्च येतो. त्यामुळे या खर्चाची वसुली संबंधित अतिक्रमणधारकांकडून करण्याची गरज आहे. त्यांना नोटीस देत ती वसुली झाल्यास भविष्यात अतिक्रमण करण्यास कुणी धजावणार नाही.
शहरातील सौंदर्यीकरणासाठी पुढे येण्याची गरज : शहर सौंदर्यीकरणासाठी येथील उद्योजक, व्यापारी, खासगी बँका यांनी पुढे येण्याची गरज आहे. शहरातील अतिक्रमणाचा
सफाया झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी सौंदर्यीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे.