आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Encroachment Removal Separately,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजी विक्रेत्यांचा अतिक्रमण हटाव पथकावर हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जठारपेठ चौकातील अतिक्रमण काढताना 20 जूनला भाजी विक्रेत्यांनी कर्मचार्‍यांसह जेसीबी मशीनवर दगडफेक केली. या दगडफेकीत तीन कर्मचारी जखमी झाले, तर तीन वाहनांच्या काचा फुटल्या. अतिक्रमण हटाव पथकाने भाजीसह हातगाड्या जप्त केल्या आहे. या कारवाईमुळे जठारपेठ चौकात काही काळ तणावाचे वातावरण होते.
जठारपेठ चौकातील भाजी विक्रेते प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत. यापूर्वी अनेकदा भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली, परंतु चारचाकी गाड्या जप्त केल्या नव्हत्या. 19 जूनला आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी स्वत: उपस्थित राहून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली होती. परंतु, भाजी विक्रेत्यांनी पुन्हा 20 जूनला पुन्हा चारचाकी गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या केल्या. त्यामुळे 20 जूनला उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या उपस्थितीत कारवाई सुरू केली. संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी दोन ट्रक व एक जेसीबी मशीनवर दगडफेक केली. या दगडफेकीत जेसीबीचालक मधुकर कांबळे यांचे डोके फुटले तर अशोक मृदुंगे, सूर्यकांत बन्सोड हे दोन वाहनचालक जखमी झाले. दगडफेकीनंतर भाजी विक्रेत्यांनी आपल्या चारचाकी गाड्या जिथे जागा मिळेल तेथे उभ्या केल्या. परंतु, उपायुक्त चिंचोलीकर यांनी स्वत: परिसर पिंजून काढून या गाड्या शोधून जप्त केल्या. तसेच पाणपोईसह रसवंती, पानठेले, चहाच्या टपर्‍या जेसीबी मशीनच्या साहाय्याने चिरडून टाकल्या.
रामदासपेठ पोलिसांचे वरातीमागून घोडे :
अतिक्रमणधारकांनी पथकावर अचानक दगडफेक केली. यात मनपाचा गजराज तसेच दोन वाहनांच्या काचा फुटल्या, तसेच कर्मचार्‍यांना सुद्धा अतिक्रमणधारकांच्या दगडफेकीचा सामना करावा लागला. ही घटना रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे प्रथम घटनेची माहिती रामदासपेठ पोलिसांना देण्यात आली. मात्र, रामदासपेठ पोलिस घटनास्थळावर तब्बल एक तास उशिरा पोहचले.
आयुक्त आक्रमक
हल्ला झाल्यानंतर आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली. त्यांनी कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत अतिक्रमणविरोधी कारवाई केली. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी आक्रमकपणे काम करत जठारपेठ, रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाइन या भागातील अतिक्रमणाचा सफाया केला.

जखमींमध्ये ‘मानसेवी’
जखमी कर्मचार्‍यांमध्ये मधुकर कांबळे हे मानसेवी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अद्यापही कामाचे आदेश दिले नाहीत. मजदूर युनियनचे अध्यक्ष कैलास पुंडे, विठ्ठल देवकते, कास्ट्राइब संघटनेचे अध्यक्ष अनिल बिडवे, विजय पारतवार, रवींद्र शिरसाट यांनी निषेध व्यक्त केला. तसेच हल्ला करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कारवाई होणारच
भाजी विक्रेत्यांनी दगडफेक केली असली तरी चौकाला अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमणधारकांवर कारवाई होणारच. ही मोहीम सर्वत्र राबवण्यात येणार असल्याने ज्या नागरिकांनी अतिक्रमण केले असेल त्यांनी स्वत: अतिक्रमण काढावे.’’ दयानंद चिंचोलीकर, उपायुक्त महापालिका