बुलडाणा - इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे शिक्षण मातृभाषेतून दिले जावे, मराठी भाषेसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, अखिल भारतीय संमेलनाला देण्यात येणारे २५ लाख रुपयांचे अनुदान बंद करावे, मुंबईतील विज्ञान काँग्रेसमधील अवैज्ञानिक गोष्टींचा निषेध, संस्कृतची सक्ती नसावी यांसह पंतप्रधान
नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित सांस्कृतिक दहशतवादाचा तीव्र निषेध असे आठ ठराव विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात पारित करण्यात आले.
बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणातील ताराबाई शिंदे साहित्य नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. या कार्यक्रमात हे ठराव पारित करण्यात आले. विद्रोहीचे सेक्रेटरी सिद्धार्थ जगदेव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोपीय कार्यक्रमास किशोर ढमाले, डॉ. अजीज नादाफ, प्रतिमा परदेशी व संमेलनाध्यक्ष जयंत पवार, साजूबाई गावित, अॅड. जयश्री शेळके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना जगदवे यांनी वर्तमान काळात देशात सुरू असलेल्या सांस्कृतिक दहशतवादासह अनेक बाबींवर ऊहापोह करत प्रत्येकाने
आपले आत्मभान जागृत ठेवण्याचे आवाहन केले.साजूबाई गावित यांनी आम्ही निसर्गपूजक आहोत. आमच्यावर आम्ही वाघाची शिकार करणारे आहोत, असा आरोप लावल्या जातो. पण, आम्ही वाघाची शिकार करत नाही तर त्याचे रक्षण करतो, असे सांगून उपस्थित विद्रोही रसिकांना आपल्या खास आदिवासी शैलीत संबोधून उपस्थितांना आकर्षित केले.
विचारांची शिदोरी : पवार
संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांनी आपल्या भाषणात १३ व्या विद्रोही साहित्य संमेलनाने आपणास भरभरून दिल्याचे भावना व्यक्त केली. ‘या संमेलनात मिळालेल्या विचारांची शिदोरी ही आयुष्यातील पुढील कार्यामध्ये आपणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे’, असे सांगतानाच त्यांनी आनुषंगिक बाबींचा ऊहापोह केला.