आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Engineering Professor To Patient Holder Scientist

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियांत्रिकी प्राध्यापक ते पेटंटधारक शास्त्रज्ञ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोल्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅन्डर्ड अँण्ड टेक्नॉलॉजी, मेरिलॅण्ड, वॉशिंग्टन या जगातील सर्वात मोठय़ा रिसर्च लॅबमधील संशोधक हा थक्क करणारा प्रवास आहे अकोल्याच्या शोनाली नजारे यांचा.

विमान अपघातात आग लागून होणारी हानी टाळण्याच्या संशोधन प्रकल्पात सहभाग, फायर फायटर्ससाठी तयार केलेला विशिष्ट पोषाख, त्याचे मिळवलेले पेटंट अशी कामगिरी त्यांच्या नावे जमा आहे. त्यांची ही कामगिरी अकोल्यातीलच नव्हे तर विदर्भातील उच्च पदवीधारकांना प्रेरणा देणारी आहे. शोनाली यांनी आपल्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. अकोल्यात शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी मिळाल्यानंतर शोनाली यांनी बडोदा येथून मास्टर्स इन टेक्स्टाईल्स पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातच प्राध्यापिका म्हणून काम सुरू केले.

महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा. के. सेनगुप्ता यांना त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांनी मदत केली. त्याच मदतीमुळे के. सेनगुप्ता यांच्या निधनानंतर त्यांच्या अमेरिकेतील मामांनी शोनाली यांना, ‘तुला काय हवे?’, असा प्रश्न केला. त्यांनी परदेशात पीएच.डी. करण्याचा मानस व्यक्त केला. येथूनच त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. ‘कापड कसे जळते?’ हा सर्वसाधारण प्रश्न घेऊन त्यांनी निरनिराळ्या प्रकारचे कापड कसे जळते, का जळते? आदी प्रश्नांची उकल पीएच.डी.च्या प्रबंधात केली. त्याच संशोधनाच्या आधारावर त्यांना वॉशिंग्टनच्या मेरिलॅण्डमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅण्डर्ड अँण्ड टेक्नॉलॉजीमध्ये एअरक्राफ्ट्समध्ये जे मटेरियल वापरतात त्यावर संशोधन करण्याची संधी मिळाली. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या,‘नुकताच सॅनदिअँगो येथे विमान लॅण्ड करताना मोठा अपघात घडला. एवढा मोठा अपघात होऊनही केवळ दोघांचा मृत्यू झाला. हाच अपघात आठ ते दहा वर्षांपूर्वी घडला असता तर विमानातील सर्व प्रवासी मृत झाले असते. आम्ही अपघातग्रस्त विमान पेटून होणारी हानी टाळण्यासाठी संशोधन करून नवनवीन प्रयोग करतो. आमच्या प्रयोगांमुळे वित्त व जीवितहानी कमी झाली आहे.’

फायर फायटर्ससाठी विशिष्ट पोषाख
कुठेही आग लागल्यानंतर आपला जीव धोक्यात घालून इतरांना वाचवणार्‍या फायर फायटर्सला अधिक संरक्षण मिळावे म्हणून मी विशिष्ट प्रकारचे कापड संशोधनातून तयार केले आहे. या कापडापासून बनवलेल्या पोषाखाच्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या असून, तो सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्याही उपयोगी पडणार आहे. माझ्या या संशोधनाचे पेटंट मी मिळवले आहे.

संशोधनात आगेकूच करा
संशोधन क्षेत्रात युवावर्गाने पुढे यावे, असे मला वाटते. आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात आग लागतात. त्यामध्ये कापसासह अनेक प्रकारचा माल जळतो. मोठी वित्तहानी, जीवितहानी होते. या आगी का लागतात? त्या पसरू नयेत म्हणून काय करता येईल? हानी कशी टाळता येईल? या प्रश्नांची उकल आपण करायला हवी.

युवक-युवतींनो, शास्त्रज्ञ व्हा
आपल्याकडे इंजिनिअर, डॉक्टर होण्याकडे जास्त कल आहे. मात्र, त्याऐवजी शास्त्रज्ञ व्हा. मी अकोल्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सातत्याने संशोधन क्षेत्रातील संधींविषयी माहिती देते. मात्र, युवक-युवती मला एकच प्रश्न विचारतात की, मी संशोधनात उतरलो तर मला किती पैसे मिळणार? हा दृष्टिकोन बदलावा.