आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Environment News In Marathi,Great Indian Bustard, Landon Zeology Society

भारतातील 15 पक्षी प्रजाती धोक्यात;लंडन प्राणिशास्त्र सोसायटी, याले विद्यापीठाचा अभ्यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पक्षी हे पर्यावरण स्वस्थ असल्याचे प्रतीक असून, लंडन प्राणिशास्त्र सोसायटी व याले विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून जगातील 100 पक्षी प्रजाती धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये 15 पक्षी प्रजाती भारतातील आहेत. त्यापैकी 12 प्रजातींच्या संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी विविध उपक्रम राबवत आहे. विशेष म्हणजे, संकटग्रस्त प्रजातींपैकी तणमोर (लेसर फ्लोरिकन)चे अकोला जिल्ह्यात, तर रानपिंगळ्याचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वास्तव्य आहे.


लंडन प्राणिशास्त्र सोसायटी व याले विद्यापीठाच्या संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीमध्ये भारतातील बंगाल फ्लोरिकन, रानपिंगळा (फॉरेस्ट आऊलेट), लाल डोक्याचे गिधाड (रेड हेडेड व्हल्चर), इजिप्शियन गिधाड, जॉर्डनचा धावक (जॉर्डनस् कोर्सर), तणमोर (लेसर फ्लोरिकन), स्पून बिल्ड सॅन्डपायपर, सोशिएबल लॅपविंग, सायबेरियन क्रेन, ग्रेट इंडियन बस्टर्ड, ग्रेटर अँडजन्ट, व्हाइट बेलीड हेरॉन, वूड स्नाइप, मास्कड फिनफुट अँड ख्रिसमस आइसलॅन्ड फ्रि गेटबर्ड या 15 पक्षी प्रजातींचा समावेश आहे. यापैकी 12 पक्षी प्रजातींना वाचवण्यासाठी बीएनएचएसमार्फत किंवा इतर स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने धडपड सुरू आहे. यामध्ये बंगाल फ्लोरिकन, तणमोर (लेसर फ्लोरिकन), ग्रेट इंडियन बस्टर्ड, सोशिएबल लॅपविंग व जॉर्डनस् कोर्सर हे पक्षी त्यांचा अधिवास नष्ट झाल्याने धोक्यात आले आहेत. त्यांचा अधिवास आणि गवताळ प्रदेश नष्ट झाल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्पूनबिल्ड सॅन्डपायपर, सायबेरियन क्रेन व व्हाइट बेलीड हेरॉन हे पाणथळ, दलदल अधिवासावर अवलंबून आहेत. मध्य भारतातील पानगळीचे वने नष्ट होत असल्याने रानपिंगळा धोक्यात आला आहे. देशातील जंगलांची तोड, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी रसायनांचा सर्रास वापर या कारणांमुळे पक्षी प्रजातींवर संकट ओढवले आहे.


अधिवास संवर्धनाची गरज
हे संकटग्रस्त पक्षी व त्यांचा अधिवास जसे गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश हे भारतीय निसर्ग संवर्धन चळवळीत अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. त्यामुळे आता संवर्धनासाठी अभ्यासपूर्ण परिणाम करणार्‍या उपाययोजनांची गरज आहे. डॉ. असद रहमानी, संचालक, बीएनएचएस.